अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 02:26 PM2020-10-17T14:26:33+5:302020-10-17T14:31:08+5:30
Sharad Pawar मराठवाडा दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, औसा, परांडा, उस्मानाबाद आणि उमरगा येथील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
औरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १८ आणि १९ ऑक्टोबर असे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
मराठवाड्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन सारखे काढणीला आलेले पिक वाया गेली. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात शरद पवार तुळजापूर, औसा, परांडा, उस्मानाबाद आणि उमरगा येथील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतला 'व्हिसी'मार्फत आढावा
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच अतिवृष्टी झालेल्या विभागाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.