शरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली, अन्यथा मराठा आरक्षण मिळाले असते: छत्रपती संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 12:17 IST2024-11-13T12:16:12+5:302024-11-13T12:17:12+5:30
आमचा लढा हा विस्थापितांसाठी आहे. प्रस्थापितांनी आजपर्यंत जनतेला विकासापासून दूर ठेवले आहे.

शरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली, अन्यथा मराठा आरक्षण मिळाले असते: छत्रपती संभाजीराजे
बीड : १९९४ सालीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. परंतु शरद पवार यांनी ऐनवेळी कच खाल्ली. मराठा समाजासाठी ज्यांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मी कायम उभा आहे. जरांगे व माझी भूमिका वेगळी नाही, असे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे मंगळवारी बीडमध्ये आले होते. तालुक्यातील वानगाव येथील माँ जिजाऊ साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर झालेली कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या सभेस महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय जाधव, राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कुडेकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर तळेकर, चौसाळा जि. प. गटातील प्रमुख गौतम नाईकवाडे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, आमचा लढा हा विस्थापितांसाठी आहे. प्रस्थापितांनी आजपर्यंत जनतेला विकासापासून दूर ठेवले आहे. बीड विधानसभा क्षेत्रात एका सामान्य कुटुंबातील कुंडलिक खांडे यांच्यासारखा युवा कार्यकर्ता पुढे येत असताना त्याला अनेक कटकारस्थाने करून अडकून ठेवण्याचे पाप याच लोकांनी केल्याची टीका संभाजी राजे यांनी केली.