शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:01 AM2017-07-23T01:01:39+5:302017-07-23T01:03:55+5:30
औरंगाबाद :शरद पवार यांच्या विधिमंडळ व संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधिमंडळ व संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार सोहळा येत्या शनिवारी (दि.२९) देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता होणार असल्याची माहिती सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व कार्याध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शरद पवार यांच्या सुवर्णमहोत्सवी संसदीय कारकीर्दीनिमित्त राज्यातील विविध भागांत नागरी सत्कार घेण्यात येत आहेत. यामुळे मराठवाड्यातर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, पवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या तारखा जुळत नसल्यामुळे कार्यक्रमास दोन महिने उशीर झाला आहे. शेवटी २९ जुलै ही तारीख अंतिम झाल्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असल्याचे कागलीवाल यांनी सांगितले.
पवार यांचा सत्कार केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या सोहळ्याला विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्वपक्षीय खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला नागरी सत्कार सोहळा समितीचे सदस्य प्राचार्य प्रतापराव बोराडे, अंबादास दानवे यांच्यासह पंडितअण्णा हर्षे, अभिजित देशमुख, मोहन सावंत आदी उपिस्थत होते.