जन्मभूमीच्या शोधासाठी ‘ती’ जर्मनीहून पोहचली परभणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:59 PM2017-10-28T23:59:25+5:302017-10-28T23:59:25+5:30
आपल्या जन्मभूमीचा आणि आई-वडिलांचा शोध घेत जर्मनीमध्ये दत्तक गेलेल्या एका युवतीने थेट जर्मनीहून परभणीपर्यंतचा प्रवास केला. दिवसभर जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या जन्माचे आणि पालकांचे दस्तावेज तीने शोधले. मात्र रुग्णालयात अभिलेखे उपलब्ध नसल्याने स्वत:च्या जन्माविषयीची तिला माहिती मिळू शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आपल्या जन्मभूमीचा आणि आई-वडिलांचा शोध घेत जर्मनीमध्ये दत्तक गेलेल्या एका युवतीने थेट जर्मनीहून परभणीपर्यंतचा प्रवास केला. दिवसभर जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या जन्माचे आणि पालकांचे दस्तावेज तीने शोधले. मात्र रुग्णालयात अभिलेखे उपलब्ध नसल्याने स्वत:च्या जन्माविषयीची तिला माहिती मिळू शकली नाही.
औरंगाबाद येथील शिशू सदनमधून एका जर्मन कुटुंबियांनी ४२ वर्षांपूर्वी एका मुलीस दत्तक घेतले होते. सुशिला हनमन फिश्चर असे या मुलीचे नाव असून सुशिलाने जर्मनी येथेच आपले शिक्षण पूर्ण केले. नर्सिंग कोर्स पूर्ण करुन सुशिला सध्या जर्मनी येथेच नोकरी करते. तिचे पती क्लाऊड हे एका कंपनीत नोकरीला आहेत. या दांम्पत्यास एक मुलगी आणि दोन मुले असे अपत्य आहेत. औरंगाबाद येथून दत्तक घेतलेल्या सुशिला यांना वारंवार आपल्या जन्मभूमीची ओढ लागली होती. त्यामुळे जन्मभूमी आणि आपल्या माता-पित्याच्या शोधात सुशिलाने २८ आॅक्टोबर रोजी परभणी शहर गाठले. प्रारंभी सुशिला यांनी औरंगाबाद येथील शिशू सदनमध्ये माहिती घेतली तेव्हा परभणी येथून शिशू सदनमध्ये दाखल केले असल्याचे समजले.
औरंगाबाद येथील शिशू सदनातील अहवालानुसार १३ डिसेंबर १९७५ रोजी त्यांचा जन्म परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा रुग्णालयातून जन्माविषयीची आणि आपल्या माता-पित्याची माहिती मिळविण्यासाठी त्या परभणी आल्या. या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात त्यांनी ही कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयात अहवाल उपलब्ध नव्हता. त्यामुळे सुशिला अत्यंत भाऊक झाल्या होत्या. त्यांना निराश व्हावे लागले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील प्रसुती कक्षास भेट देऊन तेथील महिलांशीही संवाद साधला.
आणखी दोन दिवस त्या येथे थांबणार असून आपल्या माता-पित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. शनिवारी त्यांनी नानलपेठ पोलीस ठाण्याला भेट देऊन जुन्या दस्ताऐवजांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना दस्ताऐवज मिळाले नाहीत.