ती माझीच मुलगी, भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव करणाऱ्या पुष्पाताई म्हणतात...
By महेश गलांडे | Published: January 19, 2021 03:12 PM2021-01-19T15:12:19+5:302021-01-19T15:13:11+5:30
भास्कर पेरे यांच्या मुलीच्या विरोधीतील पॅनेलप्रमुख कपिंद्र पेरे यांनीही अनुराधा पेरे पाटील यांचा हा पराभव नसल्याचे म्हटलंय. कारण, त्यांनी उमेदवारच उभे केले नव्हते.
औरंगाबाद/मुंबई - राज्यात सगळीकडे ग्रामपंचायतीचा निकालांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्के पोहचले आहेत, यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निकालात गावकऱ्यांनी काही ठिकाणी धक्कादायक कौल दिले आहेत, यातच पाटोदा ग्रामपंचायतीत लागलेला निकाल ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, ज्या पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचलं, त्यांच्याच पॅनेलला गावकऱ्यांनी नाकारल्याचं चित्र आहे. मात्र, माझ्या मुलीचा पराभव माझ्यासाठी धक्कादायक निकाल नसल्याचं पेरे पाटील यांनी म्हटलंय. तसेच, या देशाने इंदिरा गांधीसारख्या नेत्यांचाही पराभव पाहिलाय, अशा शब्दात पेरे पाटील यांनी मुलीच्या पराभवाची समिक्षा केलीय. तर, अनुराधा यांचा पराभव करणाऱ्या पुष्पा पेरे यांनीही तो पराभव नसल्याचं मत व्यक्त केलंय.
भास्कर पेरे यांच्या मुलीच्या विरोधीतील पॅनेलप्रमुख कपिंद्र पेरे यांनीही अनुराधा पेरे पाटील यांचा हा पराभव नसल्याचे म्हटलंय. कारण, त्यांनी उमेदवारच उभे केले नव्हते. आमच्या पॅनलमधील 8 जण बिनविरोध निवडून आले आहेत. केवळ 3 जागांसाठी येथे निवडणूक झाली, त्यामध्येही 2 अपक्ष आणि 1 त्यांची मुलगी होती. त्यामुळे, हा त्यांच्या पॅनलचा विषयच नव्हता. यापुढेही भास्कर पेरे पाटील यांचं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी घेणारच आहोत, असे कपिंद्र यांनी म्हटलंय. तर, अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव हा पराभव नसून ती माझीच मुलगी आहे. मी आले तरी तीच निवडणूक आलीय अन् ती आली तरी मीच, असे मत पुष्पा पेरे यांनी व्यक्त केलंय. पुष्पा पेरे पाटील यांनीच अनुराधान हिचा पराभव केला आहे.
भास्कर पेरे पाटील म्हणतात
आपल्याकडं बुद्धीवंत आणि समजणारांची कमतरता आहे, माझ्या मुलीकडे एक मुलगी म्हणून पाहू नका. कारण, गावातून निवडूण आलेले सर्वजणच आपलेच आहेत. मी गेल्या 8 दिवसांपासून गावाबाहेर आहे, मी कर्नाटकात होतो. माझी सख्खी मुलगी असली तरी, अख्ख गाव माझंय, अशा शब्दात भास्कर पेरे पाटील यांनी आपल्या मुलीच्या पराभवाच्या समिक्षा केलीय. मुलीची इच्छा होती, म्हणून तीने निवडणूक लढवली. त्यात 10-12 मतांनी तिचा पराभव झाला, त्यात विशेष काही नाही. यातून खूप काही शिकायला मिळतं. माझाही एकदा पराभव झाला होता, इंदिरा गांधींसारखे नेते निवडणुकीत पडलेत, त्यात काही विशेष नाही. कारण, आपल्या देशात लोकशाही आहे.
लोकांनी तुमच्या मुलीला का नाकारावं? या प्रश्नावर उत्तर देताना, माझ्या मुलीला का करावं?, असा प्रतिप्रश्न पेरे पाटील यांनी केला. गावातील लोकं सुशिक्षित अन् समजदार आहेत. गावाला पुढे घेऊन जाणारे सर्व लोकं आहेत. त्यामुळे, गावचा विकास थांबणार नाही, गावच्या राजकारणात अनेक हेवेदावे असतात. पण, निवडून आलेल्या उमेदवार मुलीच्या गळ्यात माझ्या मुलीने हार घातला, यावरुन आपण सर्व लक्षात घेतला पाहिजे, असे पेरे पाटील यांनी सांगितलं. आता, मी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. त्यासाठी, मी स्वत: वेगळं कार्यालय सुरू केलं आहे, असेही पाटील यांनी म्हटलं.
अनुराधा यांचा 25 मतांनी पराभव
पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडीत झाली, या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारलं आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील ८ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३ जागांसाठी मतदान घेण्यात आलं, त्यातील एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या होत्या.