दहावीत नापास होण्याच्या धास्तीने तिने केली आत्महत्या, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 09:05 PM2019-06-09T21:05:16+5:302019-06-09T21:34:58+5:30
साक्षी पांढरे ही विश्वभारती कॉलनीतील जय भवानी विद्यामंदिर शाळेत शिकत होती.
औरंगाबाद : दहावी परिक्षेचा निकाल लागण्याच्या चार दिवस आधीच परीक्षेत नापास होण्याच्या भीतीपोटी आत्महत्या करणारी साक्षी अशोक पांढरे (वय १५, रा.विजयनगर, गारखेडा परिसर) ही उत्तीर्ण झाल्याचे समोर आले. दहावी बोर्ड परीक्षेचा शनिवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला तेव्हा साक्षी ५३.६० टक्के गुण मिळाले पास झाल्याचे समोर आले.
गारखेडा परिसरातील विजयनगर येथील रहिवासी साक्षी पांढरे ही विश्वभारती कॉलनीतील जय भवानी विद्यामंदिर शाळेत शिकत होती. मार्च महिन्यात तीने दहावीची परिक्षा दिली होती. परिक्षेत पेपर अवघड गेल्याने परिक्षेनंतर साक्षी नाराज होती. मात्र नंतर ती पूर्ववत झाली होती. दरम्यान बारावीचा निकाल जाहीर झाल्यापासून दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा सुरू झाली. तेव्हापासून साक्षी मानसिक तणावात होती. आपण नापास होऊ अशी भीती तिला वाटत होती. नापास होण्याच्या धास्तीतच ३ जून रोजी सकाळी आई-वडील घरी नसताना साक्षीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
साक्षीचे वडील अशोक पांढरे हे वाहनचालक आहे तर तिची आई आई धुण्या-भांड्याचे काम करून संसाराला हातभार लावते. तर तिचा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. साक्षीने आत्महत्या केल्यापासून पांढरे कुटुंब दु:खात बुडाले आहे. शनिवारी दहावीचा निकाल ऑनलाइन घोषित झाला. तेव्हा तिच्या भावाने साक्षीचे हॉल तिकिटवरील तिचा क्रमांक पाहून तिचा निकाल पाहिला तेव्हा साक्षीला ५३.६० टक्के गुण मिळाल्याचे त्याला दिसले. हा निकाल पाहून नातेवाईकांना पुन्हा साक्षीच्या आठवणीने भूतकाळात नेले.