जगण्यानेच नव्हे तर मरणानेही तिला छळले...; कुटुंबीयांनी पाठ फिरवल्याने १८ तासांनंतर महिलेवर अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 05:07 PM2020-12-01T17:07:14+5:302020-12-01T17:09:23+5:30
मुलांनी सदर महिला ही आपली आई नाही, आपली आई अडीच वर्षांपूर्वीच वारल्याचे सांगितले.
औरंगाबाद : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, सुरेश भटांची जगण्यातील छळवाद मांडणारी ही कविताही काहीशी खोटी ठरल्याचा प्रत्यय सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांना आला. घाटीत मृत्यू पावलेल्या महिलेच्या अंत्यविधीसाठीही तिची मुले आली नाहीत, तर बेवारस म्हणून अंत्यविधी करताना पैसे उकळण्याच्या प्रकाराने स्मशानभूमीतून मृतदेह पुन्हा घाटीत न्यावा लागला. शेवटी १८ तासांनंतर पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.
सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सुमनबाई मारुती बनारसे ही महिला सिल्लोड येथे सरकारी रुग्णालयाबाहेर आढळली होती. माणुसकी समूहाच्या मदतीने तिला घाटीत उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना दि. २७ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला; परंतु तिच्या मुलांनी आम्ही येऊ शकत नाही, असे सांगितले. मनपाने बचत गटाला अंत्यविधीचे काम सोपविले. पोलीस हेड काँस्टेबल आर. के. वर्पे यांनी फोनवर त्यांच्याशी संपर्क केला. ग्रामीण भागातील मृतदेह आहे. त्यामुळे ३ हजार रुपये लागतील, असे त्यांना गटातर्फे सांगण्यात आले. ही रक्कम कशी द्यायची, असा प्रश्न पोलिसांना पडला.
तेव्हा माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांनी स्वत: अंत्यविधी करण्याचे ठरविले. ५ रुपये शुल्क देऊन सदरील स्मशानभूमीची परवानगी घेतली; परंतु स्मशानात गेल्यानंतर तुम्ही अंत्यविधी करू शकत नाही, असे बचत गटाच्या लोकांनी म्हणत विरोध केला. माणुसकी समूहाने खड्डा खोदायला सुरुवात केली; पण बचत गटाच्या लोकांनी फावडे हिसकावून घेतले. त्यामुळे मृतदेह स्मशानभूमीतून पुन्हा घाटीत नेण्यात आला. सदरील घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सोमवारी दुपारी १२.३० वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.
आई मृत्यू पावल्याचे सांगितले
सदर मयत महिला ही सिल्लोडमध्ये एकटीच राहत होती. चौकशी, माहितीवरून एका कुटुंबातील सदस्यांना विचारपूस केली, तेव्हा या कुटुंबातील मुलांनी सदर महिला ही आपली आई नाही, आपली आई अडीच वर्षांपूर्वीच वारल्याचे सांगितले. इतर कोणी नातेवाईकही सापडले नाहीत. नातेवाईक शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; परंतु कोणीही मिळाले नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.
-आर. के. वर्पे, पोलीस हेडकान्स्टेबल, सिल्लोड
...यामुळे करावे लागते दफन
अशा मृत्यूच्या घटनांनंतर अनेकदा कायदेशीर बाबी, वाद उद्भवण्याची शक्यता असते. नातेवाईक समोर येऊन मृत्यूविषयी आरोप- प्रत्यारोप होतात. त्यामुळे मृतदेह दफन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले
रुग्णवाहिका, खड्डे खोदण्यासाठी पैसे
रुग्णवाहिका, खड्डे खोदणे यासाठी २,५०५ रुपये मोजावेच लागले. यासाठी सिल्लोडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, बेगमपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पो. हे. कॉ. आर. के. वर्पे, पोलीस नाईक श्याम जाधव, अमोल ढाकरे, दिगंबर सोनटक्के, सुमित पंडित आदींनी मदतकार्य केले.