महापौरपदासाठी शीला भवरेंची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:02 AM2017-10-28T01:02:24+5:302017-10-28T01:02:32+5:30
नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेङ: नांदेड शहराच्या पहिल्या दलित महापौर होण्याचा बहुमान काँग्रेसच्या शीलाताई किशोर भवरे यांना मिळणार आहे. काँग्रेसकडून महापौरपदाच्या चार नावांपैकी शुक्रवारी शीलाताई भवरे यांच्या नावावर काँग्रेस नेतृत्वाने मोहर उमटवताना त्यांना महापौरपदासाठी संधी दिली. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसने विनय गिरडे यांना संधी दिली आहे.
महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी मुदत होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार होते. काँग्रेसकडून महापौरपदासाठी गुरुवारी शीलाताई भवरे, दीक्षा धबाले, ज्योती कदम, ज्योती रायबोले यांनी अर्ज घेतले होते. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रशांत तिडके, विनय गिरडे आणि सतीश देशमुख यांनी अर्ज घेतले होते. यापैकीच महापौर आणि उपमहापौरपदाची संधी मिळणार हे स्पष्ट होते.
शुक्रवारी काँग्रेसकडून महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार ठरविण्याबाबत शहरातील आयटीएम कॉलेजमध्ये प्रमुख नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर महापौरपदासाठी काँग्रेसने शीलाताई भवरे यांची निवड अंतिम केली तर उपमहापौरपदासाठी गिरडे यांना अर्ज भरण्याचे निर्देश दिले.
हे आदेश मिळाल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी महापालिका गाठली. येथे आ. राजूरकर, आ. सावंत यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठी शीलाताई भवरे यांनी तर उपमहापौरपदासाठी विनय गिरडे यांनी आपले अर्ज भरले. यावेळी महापौर शैलजा स्वामी, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण, उमेश पवळे, संगीता पाटील डक, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.
भाजपाकडूनही या दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आला आहे. महापौरपदासाठी भाजपकडून बेबीताई गुपिले तर उपमहापौरपदासाठी गुरुप्रितकौर सोडी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे महापौर व उपमहापौरदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
उमेदवार दाखल केल्यानंतर माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांनी काँग्रेसला नांदेडकरांनी दिलेला बहुमताचा कौल हा जबाबदारी वाढवणारा असल्याचे सांगितले. काँग्रेसने जनतेला दिलेली सर्व आश्वासने आगामी काळात पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकहाती सत्ता असली तरी ती जबाबदारीने सांभाळली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आ. अमरनाथ राजूरकर यांनीही अशोकरावांच्या नेतृत्वावर नांदेडकरांनी विश्वास ठेवून काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिल्याचे सांगितले. आगामी काळातही काँग्रेसला जिल्ह्यात तसेच राज्यात चांगले यश मिळणार आहे़ त्याची सुरुवात नांदेडपासून झाली असल्याचेही ते म्हणाले़