कॉपी प्रकरणात शेंद्र्याचे ‘ते’ महाविद्यालय दोषी; चौकशी अहवालानुसार विद्यापीठाची कारवाई
By विजय सरवदे | Published: April 15, 2023 08:22 PM2023-04-15T20:22:34+5:302023-04-15T20:23:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गैरप्रकारामुळे त्या महाविद्यालयाचे केंद्र रद्द करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी महाविद्यालय हे कॉपी प्रकरणात दोषी आढळले आहे. त्यामुळे या केंद्रावर झालेल्या उन्हाळी परीक्षेच्या सर्व उत्तरपत्रिका स्वतंत्र्यरीत्या प्राध्यापकांकडून तपासून त्यासंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी परीक्षा विभागाला दिले आहेत. तोपर्यंत परीक्षेचा निकाल लावण्यात येऊ नये, असेही सूचित केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गैरप्रकारामुळे त्या महाविद्यालयाचे केंद्र रद्द करण्यात आले. दरम्यान, या महाविद्यालयातील गैरप्रकाराच्या चौकशी संदर्भात अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमण्यात आली होती. या समितीने ५ एप्रिल रोजी संबंधित परीक्षा केंद्रास भेट दिली. दोन दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासले. याशिवाय संबंधित महाविद्यालय, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य तसेच झेरॉक्स सेंटर व अन्य घटकांकडून माहिती घेतली.
या समितीने बुधवारी (दि. १२) कुलगुरुंकडे चौकशी अहवाल सादर केला. समितीने काढलेल्या निष्कर्षानुसार त्या महाविद्यालयामध्ये भौतिक सुविधा नाहीत. महाविद्यालयाने परीक्षेच्या कामाचे गांभीर्य लक्षात घेतलेले नाही. त्यासाठी सदर महाविद्यालयास दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात यावा व दंडाची रक्कम सात दिवसांमध्ये (दि.२०) न भरल्यास त्यावर १० टक्के व्याज आकारण्यात यावे व रक्कम वसूल झाल्याशिवाय या महाविद्यालयातील विद्यार्थांचे परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येऊ नयेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत करण्यात यावी, दरम्यान, समितीच्या शिफारसीनुसार परीक्षा विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भारती गवळी यांनी कळविले आहे.
तोपर्यंत निकाल रोखणार
विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राचार्य, प्राध्यापक नाहीत. त्याअन्वये दि. १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत या महाविद्यालयास निवेदन करण्याची संधी दिली आहे. या परीक्षा केंद्रावर मार्च-एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या उन्हाळी परीक्षाच्या सर्व विषयांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे प्राध्यापकांकडून तपासून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात यावा. तोपर्यंत या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी २०२३ परीक्षेचे निकाल लावण्यात येऊ नयेत, असे परीक्षा विभागाला सूचित केले असून, आगामी काळात अकॅडमिक ऑडिट, महाविद्यालयाचे संलग्निकरण, परीक्षा या बाबतीत बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिला आहे.