शेवगा २५०, गवार १२० रुपये किलो; आता काय, पत्ताकोबी खाऊन दिवस काढायचे काय?
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 27, 2024 02:14 PM2024-06-27T14:14:36+5:302024-06-27T14:15:14+5:30
छत्रपती संभाजीनगर : मागील महिनाभरात भाज्यांच्या भावाने शंभरी पार केली आहे. सर्वांना आवडणाऱ्या शेवग्याच्या शेंगा किलो खरेदी केल्या तर ...
छत्रपती संभाजीनगर : मागील महिनाभरात भाज्यांच्या भावाने शंभरी पार केली आहे. सर्वांना आवडणाऱ्या शेवग्याच्या शेंगा किलो खरेदी केल्या तर चक्क २५० रुपये मोजावे लागत आहेत. गवार, फुलकोबी, सिमला, दोडके खरेदी करायचे तर प्रत्येक भाजीसाठी १०० रुपयांची नोट द्यावी लागत आहे. सध्या सर्वात स्वस्त भाजी म्हणजे पत्ताकोबी ३० रुपये किलोने मिळत आहे. आता बोला...पत्ताकोबीची भाजी खाऊन दिवस काढायचे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
भाज्यांचे भाव (प्रति किलो)
भाजी दर
१) कारले--- १०० रुपये
२) चवळी--- १०० रुपये
३) गवार--- १२० रुपये
४) वांगे---१०० रुपये
५) दोडके---१०० रुपये
६) शिमला मिरची---१०० रुपये
७) भेंडी---१०० रुपये
८) फुलकोबी--- १०० रुपये
९) शेवग्याच्या शेंगा---२५० रुपये
१०) टोमॅटो--- ८० रुपये
पहिल्यांदाच मेथीच्या भावात शेपू
भाज्याचे भाव वाढले तसेच पालेभाज्यांचे भावही वधारले आहेत. पालेभाज्यात सर्वात जास्त भावात विकली जाणारी मेथी सध्या ३० रुपये गड्डी विकत आहे. एवढेच नव्हे तर शेपूही ३० रुपयांना मिळत आहे. पहिल्यांदाच शेपू मेथीच्या भावात विकत आहे. पालक, चुका, तांदुळजा या भाज्या २० रुपयांना मिळत आहेत.
कोथिंबीर भेला ८० रुपयांना
कोथिंबिरीचा मोठा भेला ८० व छोटी गड्डी ३० रुपयांना आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कोथिंबीरही सिमला मिरचीच्या भावात म्हणजे १०० रुपयाला विकली तर नवल वाटायला नको.
कांदा, बटाट्यावर भर
भाज्या महाग झाल्या आहेत. त्यापाठोपाठ कांदा व बटाट्याचे भाव वाढले आहेत. सध्या कांदा ४० रुपये तर बटाटा ४० ते ५० रुपये किलो मिळत आहे. अनेक ग्राहकांचा कांदा व बटाटा विकत घेण्यावर भर आहे.
- सोमनाथ वाघ, भाजी विक्रेता
भाज्या खरेदी कराव्याच लागतात
भाज्या कितीही महाग झाल्या तरी खरेदी कराव्या लागतातच. आधी ५० रुपयात किलोभर मिळणारी भेंडी आता १०० रुपयात मिळत आहे. मुलांना भेंडीची भाजी आवडते तसेच कांदा व बटाट्याची भाजी आवडत असल्याने त्या खरेदीवरच आमचा भर आहे.
- सायली जोशी, गृहिणी