इज्तेमासाठी आलेल्या साडेआठ लाख वाहनांचा शिस्तीत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:00 AM2018-02-27T00:00:52+5:302018-02-27T10:34:02+5:30
लिंबेजळगाव येथील तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर तेथे आलेले लाखो साथी आणि सुमारे साडेतीन लाख चारचाकी आणि पाच लाख दुचाकी वाहने शिस्तीत परतीच्या प्रवासाला निघाली. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसने जाणाºया साथींसाठी प्राधान्य देत एक मार्ग मोकळा ठेवल्याने त्यांचा प्रवासही सुकर झाला.
औरंगाबाद : लिंबेजळगाव येथील तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर तेथे आलेले लाखो साथी आणि सुमारे साडेतीन लाख चारचाकी आणि पाच लाख दुचाकी वाहने शिस्तीत परतीच्या प्रवासाला निघाली. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसने जाणार्या साथींसाठी प्राधान्य देत एक मार्ग मोकळा ठेवल्याने त्यांचा प्रवासही सुकर झाला.
इज्तेमासाठी देशभरातून लाखो साथी सुमारे साडेतीन ते चार लाख चारचाकी वाहने आणि पाच लाख दुचाकींनी आले होते. यातील हजारो वाहने इज्तेमाच्या आठ ते दहा दिवस आधी, तर काही वाहने इज्तेमाच्या आदल्या दिवशी आणि उर्वरित वाहने इज्तेमादरम्यान तेथे दाखल झाली होती.
वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेली ही सर्व वाहने एकाच दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संयोजक आणि वाहतूक बंदोबस्तावरील अधिकार्यांनी नियोजनबद्ध वाहने सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे आणि एस.टी. महामंडळाच्या बसेस, ट्रॅव्हल्स बसेसने परत जाणार्या नागरिकांसाठी लिंबेजळगाव ते नगर नाका, महावीर चौकापर्यंत पादचारी मार्ग म्हणून खुला ठेवण्यात आला, तर दुसर्या मार्गावरून दुचाकी आणि कार सोडण्यात आल्या. मात्र, पादचार्यांची संख्या खूप जास्त असल्याने पादचार्यांनी कार आणि दुचाकींचा रस्ताही व्यापला होता. मात्र, पादचार्यांना प्राधान्य असल्याने वाहनचालकांनी त्यांना पुढे जाऊ दिले. दुपारी सुरू झालेला पादचार्यांचा प्रवास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. महावीर चौकातून पादचारी रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक येथे गेले.
रात्रभर वाहने रस्त्यावर
हजारो नागरिक ट्रकने आले होते. हे ट्रक इज्तेमाच्या वाहन पार्किंगमध्ये होते. रेल्वे, बसने जाणार्या साथींची संख्या कमी झाल्यानंतर अन्य वाहने सोडण्यात आली. आधी पायी जाणारे साथी, त्यानंतर दुचाकी, त्यानंतर कार आणि सर्वात शेवटी ट्रक आणि खाजगी बसेस सोडण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रंदिवस ड्यूटीवर
पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त विनायक ढाकणे यांच्यासह तीन उपायुक्त, सहायक आयुक्त सी.डी. शेवगण यांच्यासह आठ सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, रामेश्वर रोडगे, मनोज पगारे यांच्यासह १४ पोलीस निरीक्षक, ८२ पोलीस उपनिरीक्षक आणि १ हजार ३०० वाहतूक पोलीस तैनात होते. त्यांच्या मदतीला स्वयंसेवक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत होते.