वैजापुरात नगराध्यक्षपदी शिल्पा परदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:08 AM2018-04-13T01:08:57+5:302018-04-13T01:09:42+5:30
नगरसेवकपदासाठी सेनेला १३, भाजप ९ व काँग्रेसला १ जागा
वैजापूर : येथील नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा दिनेश परदेशी यांनी शिवसेनेच्या उमेदवार सय्यद ताशफा अजहर अली यांचा २०७३ मतांनी दणदणीत पराभव करून सत्ता ताब्यात घेतल्याने नगरपालिकेत ‘कमळ’ फुलले. परदेशी यांना २६,६८७ पैकी १३,९४६ व ताशफा यांना ११,८७३ मते मिळाली.
मात्र, नगरपालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक १३ नगरसेवक निवडून आले. भाजपचे ९ व काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला. निकाल जाहीर झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ जाधव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबी पटेल तिडीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते सहामधील नगराध्यक्ष व नगरसेवकपदांच्या उमेदवारांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर प्रभाग क्रमांक सात ते अकरामधील मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सय्यद ताशफा यांना केवळ २१० मतांची आघाडी मिळाली. मात्र प्रभाग क्रमांक सात ते अकरामध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली. या सर्व प्रभागात डॉ. दिनेश परदेशी यांचे वर्चस्व असल्याने सेनेला येथील आघाडी तोडणे कठीण झाले. अखेर भाजपच्या शिल्पा परदेशी यांनी १३,९४६ मते मिळवून त्यांच्या प्रतिस्पर्धी सय्यद ताशफा यांचा २०७३ मतांची आघाडी घेऊन पराभव केला. या विजयामुळे नगरपालिकेवर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे एकमेव उमेदवार उल्हास ठोंबरे हे प्रभाग क्रमांक १० ब मधून १२५४ मते घेऊन विजयी झाले. या प्रभागात शिवसेनेचे प्रकाश चव्हाण यांना केवळ ६६३ मते मिळाली. नगराध्यक्षपदासाठी ३७५ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. नगराध्यक्षपदाचे अन्य उमेदवार कल्पना लोखंडे (अपक्ष) यांना ६९, सय्यद आफरिन अकबर (एमआयएम) यांना २४६ व रिपाइंच्या सुनीता लाड यांना १७८ मते मिळाली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ३७५ व नगरसेवकाच्या २३ जागांसाठी तब्बल १२२८ जणांनी ‘नोटा’चा वापर केला.
सेनेच्या माजी आमदारपुत्राचा पराभव
शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांचे सुपुत्र सचिन यांचा भाजप उमेदवार शैलेश चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक सात ब मधून १२८ मतांनी पराभव केला.
शिवसेनेचे उमेदवार प्रकाश चव्हाण यांना प्रभाग क्रमांक दहा ब मधून काँग्रेसचे उल्हास ठोंबरे यांच्याकडून हार पत्करावी लागली. भाजपचे गोविंद धुमाळ यांना प्रभाग सहामधून शिवसेनेचे शेख इम्रान रशीद यांनी पराभूत केले. राष्ट्रवादीचे जाफर शेख यांना प्रभाग दोनमधून शिवसेनेचे शेख रियाज अकील यांनी पराभूत केले.
पती-पत्नी विजयी
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले दशरथ बनकर हे प्रभाग क्रमांक ११ ब मधून व त्यांच्या पत्नी माधुरी बनकर या प्रभाग क्रमांक १० अ मधून विजयी झाल्या.
पत्नी विजयी, पती पराभूत
सेनेच्या प्रीती भोपळे या प्रभाग सात अ मधून विजयी झाल्या तर त्यांचे पती परेश भोपळे हे प्रभाग ११ ब मधून पराभूत झाले.
विजयी मिरवणूक रद्द
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपटराव थोरात हे शहीद झाल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे कुठल्याही विजयी उमेदवाराने मिरवणूक काढली नाही.
प्रभाग क्रमांक निहाय विजयी उमेदवार व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळालेली मते
१ अ- सखाहरी लक्ष्मण बर्डे (शिवसेना)-११२९ (विजयी), शेख अब्दुल रऊफ (भाजप)- ५९०
१ ब - द्वारकाबाई घाटे (शिवसेना)-१०२८ (विजयी), सीमा कंगले (भाजप)- ६५५
२ अ- नंदाबाई त्रिभुवन (शिवसेना)- १४८८ (विजयी), लीलाबाई गरूड (राष्ट्रवादी)- ८१४
२ ब - शेख रियाज अकील (शिवसेना)- १६१० (विजयी), शेख जाफर हुसेन (राष्ट्रवादी)- ६९२
३ अ - स्वप्नील जेजूरकर (शिवसेना)- ११९० (विजयी), केशव आंबेकर (अपक्ष)-२५९, रतीलाल गायकवाड (भाजप)- १०९९,
३ ब -अनिता तांबे (भाजप)- ११४५ (विजयी), दीपाली बोर्डे (शिवसेना)- १०८५, साधना साखरे (अपक्ष)- ३२४
४ अ -शोभा विलास भुजबळ (भाजप)- १३३७ (विजयी), पठाण जास्मिन वासीम (एमआयएम)- ८७, इस्माईल नुसरत बेगम (शिवसेना)- १२६८
४ ब - नीलेश भाटिया (शिवसेना)- १३८३ (विजयी), सय्यद हिकमत (भाजप)- ११२२, वसीम जहूरखान पठाण (एमआयएम)- १७५
५ अ - सुप्रिया व्यवहारे (शिवसेना)- १८४२ (विजयी), अमृता आंबेकर (भाजप)- ११०२
५ ब - साबेरखान अमजदखान (शिवसेना)- १८२६ (विजयी), गौरव दोडे (भाजप)- ११२७
६ अ - शेख इम्रान रशीद (शिवसेना)- ११६४ (विजयी), गोविंद धुमाळ (भाजप)- १०९७
६ ब - ज्योती टेके (शिवसेना)- १४२५ (विजयी), श्रुती टेके (भाजप)- ८३७
७ अ - प्रीती परेश भोपळे (शिवसेना)- १७१३ (विजयी), रितू सोनवणे (राष्ट्रवादी)- ११५५
७ ब - शैलेश चव्हाण (भाजप)- १४९९ (विजयी), सचिन वाणी (शिवसेना)- १३७१
८ अ - गणेश खैरे (भाजप)- १०८० (विजयी), बबन त्रिभुवन (शिवसेना)- ६१३
८ ब -लताबाई मगर (भाजप)- ८७६ (विजयी), मनीषा वाणी (शिवसेना)- ६५९, पठाण रियानाबी (अपक्ष)- १०१, सुनीता लाड (रिपाइं)- ५३
९ अ - शेख मुमताजबी बिलाल (शिवसेना)- ८१७ (विजयी), शेख कमरून्निस मजीद कुरेशी (भाजप)- ६९४
९ ब - प्रकाश चव्हाण (शिवसेना)- ९२७ (विजयी), शेख वसीम शब्बीर (एमआयएम)- ९०, नीतेश शहा (भाजप)- ५१७
१० अ - माधुरी बनकर (भाजप)- १३९६ (विजयी), प्रीती भोपळे (शिवसेना)- ७४३
१० ब - उल्हास ठोंबरे (काँग्रेस)- १२५४ (विजयी), प्रकाश चव्हाण (शिवसेना)- ६६३, मयुरेश जाधव (राष्ट्रवादी)- २४६
११ अ - संगीता गायकवाड (भाजप)- २०१८ (विजयी), मनीषा शिंदे (शिवसेना)- १४१६
११ ब - दशरथ बनकर (भाजप)- १९८६ (विजयी), परेश भोपळे (शिवसेना)- १४३८
११ क -जयश्री दिनेश राजपूत -(भाजप) (१८०१)(विजयी), कविता जाधव (शिवसेना)- १६३७.