कामाख्या देवीची अशी पूजा घालतो की शिंदे सरकार आउट होईल; चंद्रकांत खैरेंचा चमत्कारिक दावा
By सुमेध उघडे | Published: November 23, 2022 04:40 PM2022-11-23T16:40:54+5:302022-11-23T16:46:24+5:30
हे आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी कामाख्या देवीला मागील २२ वर्षांपासून जात आहे.
औरंगाबाद : मी २२ वर्षांपासून कामाख्या देवीची पूजा करतो. आमचे सरकार गेल्यानंतर मी तिथे पूजा घातली. यामुळेच आता शिंदे सरकार अडचणीत आले आहे. आता मी पुन्हा अशी पूजा घालणार की हे सर्व आउट होतील, असा चमत्कारिक दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
शिंदे सरकार पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून खैरे टीका करत आहेत. तर दुसरीकडे खैरे यांना शिंदे गटाने गुवाहाटीला येण्याची खुली ऑफर दिली आहे. खैरे येणार असतील, त्यांनी मला निरोप पाठवला तर औरंगाबादला येऊन त्यांना घेऊन जातो असे मंत्री उदय सामंत म्हटल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. शिंदे गटाने दिलेल्या या ऑफरवर आता खैरे यांनी निशाणा साधला आहे.
खैरे म्हणाले, हे आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. मी कामाख्या देवीला मागील २२ वर्षांपासून जात आहे. मागे हे सर्व जाऊन आल्यानंतर मी जाऊन माझ्या पद्धतीने पूजा केली. म्हणून शिंदे सरकार अडचणीत आले आहे. आता यांना जाऊन येऊ द्या, मी त्यानंतर पुन्हा जाईल. कामाख्याला देवीला मी खूप मानणारा माणूस आहे. तेथे मी श्रद्धेने जातो, स्वार्थाने नाही जात. सरकार वाचविण्यासाठी शिंदे गट तिथे जात आहे. आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांचे विजय व्हावा म्हणून मी जात आहोत. तुम्ही एकदा जाऊन तर येऊ द्या त्यानंतर मी तिथे अशी पूजा घालतो की हे सर्व आउट होतील, असा चमत्कारिक दावा खैरे यांनी केला आहे.
सरकार टिकणार नाही जास्त
मी कडवट शिवसैनिक आहे. मी कुठेही जाणार नाही. माझ्या जिल्ह्यातील ५ आमदार गद्दार झाले. मी अनेकवेळा सांगूनही ते गेले. मी यांच्याविरोधात भांडत आहे. उद्धव ठाकरेंसोबत जनता आहे. आम्ही मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू. हे खोक्यांसाठी, मंत्रिपदासाठी गेले असतील, पण हे टिकणार नाही जास्त. २९, ३० नोव्हेंबरला बघा काय होते ते. मी देखील २७ तारखेला पूजा घालणार आहे. दक्षिण मुखी मारुतीला हवन करू, त्यानंतर पहा काय होते ते, असा इशाराही खैरे यांनी दिला.