'राजकीय शत्रुत्व, पण हृदयात मित्रत्व'; जैस्वाल, तनवाणी एकत्र तिरुपती बालाजीच्या दर्शनला
By बापू सोळुंके | Published: August 22, 2023 12:31 PM2023-08-22T12:31:34+5:302023-08-22T12:35:03+5:30
अनेक वर्ष शिवसेनेत एकत्र काम केलेले आ. प्रदीप जैस्वाल आणि शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांची मैत्री जगजाहिर आहे.
छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेत फुट पडल्यापासून अस्तित्वात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या नेते परस्परांविरोधात टोकाची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसते. दुसरीकडे मात्र शहरातील शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल आणि ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी मैत्री जपत नेहमीप्रमाणे एकत्र तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले आहेत.
अनेक वर्ष शिवसेनेत एकत्र काम केलेले आ. प्रदीप जैस्वाल आणि शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांची मैत्री जगजाहिर आहे. गतवर्षी शिवसेनेत उभी फुट पडली आणि आ. जैस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले. तर तनवाणी यांनी ठाकरे यांची साथ सोडली नाही. पक्षानेही त्यांची दखल घेत जिल्हाप्रमुखपद देत त्यांच्यावर शहातील पूर्व,पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविली. जैस्वाल हे 'मध्य' विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. तर तनवाणी यांना 'मध्य' मधूनच विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. यामुळे ते जोरदार तयारी करीत आहेत. दोघेही प्रतिस्पर्धी असले तरी परस्परांचे चांगले मित्र आहेत.
पक्षात उभी फुट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट शिवसेना असे दोन पक्ष अस्तित्वात आले. दोन्ही पक्षाचे शिर्ष नेते, प्रवक्ते दररोज परस्परविरोधात जोरदार टीका, टीप्पणी करीत असतात. पक्षासोबत बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिक हल्ला करतील या भितीपोटी शिंदे गटाच्या सर्व आमदारांना पोलीस सरंक्षण देण्यात आलेले आहेत. असे असताना आ. जैस्वाल आणि जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी हे मैत्री जप्त दरवर्षीप्रमाणे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी शुक्रवारी सायंकाळी एकाच विमानाने येथून रवाना झाले. त्यांच्यासोबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर-सेलूचे माजी आमदार तथा भाजपा नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि जालना आणि छत्रपती संभाजीनगर मधील उद्योजक, व्यापारीही आहेत. या सर्वांचे तिरुपती विमानतळावरील एकत्रित छायाचित्रही लोकमत ला प्राप्त झाले.