शिंदेफळ प्राथमिक शाळेला मिळाला आदर्श शाळा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:04 AM2021-06-23T04:04:41+5:302021-06-23T04:04:41+5:30
पाच वर्षांपूर्वी या प्राथमिक शाळेत केवळ ३५ विद्यार्थ्यांची संख्या होती. त्यामुळे ही शाळा बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ...
पाच वर्षांपूर्वी या प्राथमिक शाळेत केवळ ३५ विद्यार्थ्यांची संख्या होती. त्यामुळे ही शाळा बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गावकऱ्यांनी मराठी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याने आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांमध्ये दाखल केले होते. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत होती. एक दिवस सरकारी शाळा बंद होईल, या विचाराने गावकरी व शिक्षकांनी एकत्र येऊन बैठक घेतली व गावातील पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत टाकण्यास आवाहन करण्यात आले, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शिक्षकांनी आश्वासन दिले. त्यानंतर शिक्षकांनी पाच नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केल्याने व शाळेचा परिसर रंगरंगोटी, भित्तीचित्र, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या दर्जेदार शिक्षण सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा शाळेकडे वाढला. त्यामुळे ही संख्या ३५ वरून १७३ पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात झपाट्याने विद्यार्थी संख्या वाढवणारी शिंदेफळची शाळा एकमेव ठरली आहे.
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने केंद्रप्रमुख विठ्ठलराव कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक राजेश तेलंगराव व इतर शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण व विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून या प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यासाठी सरपंच कबीरचंद राजपूत, जिल्हा परिषद सदस्य अशोक गरुड, पंचायत समिती सभापती डॉक्टर कल्पना जामकर व इतरांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.