शिंदेसेनेला मांडता येईना छत्रपती संभाजीनगरमधील विजयाचे पक्के गणित?
By विकास राऊत | Published: April 2, 2024 11:26 AM2024-04-02T11:26:14+5:302024-04-02T11:31:08+5:30
भाजपाने संघटनात्मक ताकदीचा मुद्दा मांडल्याने अडचण; लोकसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून भाजपा काम करत आहे. अगदी बूथ प्रमुखांपासून ते पन्ना प्रमुखांपर्यंत सर्व नेमणुका, प्रशिक्षण झालेले आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदार संघावर शिंदेसेनेने दावा सांगितला असला, तरी संघटनात्मक ताकद आणि इतर ‘इलेक्टिव्ह मेरिट’सह त्यांना विजयाचे गणित मांडता येत नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांपासून भाजपा काम करत आहे. अगदी बूथ प्रमुखांपासून ते पन्ना प्रमुखांपर्यंत सर्व नेमणुका, प्रशिक्षण झालेले आहे. भाजपाच्या विविध आघाड्या ‘मायक्रो लेव्हल’वर काम करत आहेत. एक केंद्रीय मंत्री, राज्यात एक मंत्री, तीन आमदार, बहुसंख्य माजी नगरसेवक, ग्रामपंचायती अशी संघटनात्मक ताकद भाजपाकडे आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत सुमारे अर्धा डझन केंद्रीय मंत्र्यांचे जिल्ह्यात कार्यक्रम झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी सभा झाली. या सर्व बाबी पाहता, आमचा या मतदार संघावर दावा प्रबळ असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. या मतदार संघावर शिंदेसेनेने दावा सांगितल्यानंतर ‘तुमच्या विजयाचे गणित काय?’ अशी विचारणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेसेनेकडे केल्याची माहिती आहे. भाजपा नेत्यांकडून ही विचारणा होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार, ३१ मार्च रोजी मध्यरात्री शिंदेसेनेचे मंत्री, आमदार आणि जिल्हाप्रमुखांसोबत चर्चा केली. या बैठकीत जिल्ह्यातील एकाही नेत्याला ‘विजयाचे गणित’ नीटपणे मांडता आले नसल्याचे समजते.
शिंदेसेनेची मतदार संघातील ताकद...
जिल्ह्यातील पाच तर मतदार संघातील तीन आमदार शिंदेसेनेत आहेत. मनपातील ९ ते १० माजी नगरसेवक शिंदेसेनेत आहेत. पंचायत समितीचे तीन सदस्य आणि एक माजी आमदार शिंदेसेनेत आहेत.
वस्तुस्थिती काय...
जिल्ह्यात संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार असे दोन मंत्री आहेत. परंतु, दोघांचे विधानसभा मतदारसंघ शेजारच्या जालना लोकसभा मतदारसंघात आहेत.
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक, जि. प. सदस्य शिंदेसेनेकडे आलेले नाहीत. संघटनात्मक पातळीवर तालुकास्तरीय पक्षबांधणी झालेली नाही. बूथ प्रमुखांच्या नेमणुका नाहीत. नेते गेले तरी सर्वसामान्य शिवसैनिक उद्धवसेनेसोबत.
भाजपाची मतदार संघातील ताकद...
मतदारसंघात एक केंद्रीय राज्यमंत्री, दोन आमदार आहेत. एक राज्यात मंत्री आहे. २४ माजी नगरसेवक आहेत. १६ माजी जि. प. सदस्य आहेत. ३३७ ग्रामपंचायती भाजपाकडे आहेत. पंचायत समितीचे ३ सभापती भाजपाचे आहेत. नगराध्यक्ष भाजपाचे आहेत. १६४७ बूथपर्यंत भाजपा पोहोचला आहे. आजवरच्या सर्व सर्वेक्षणांचे अहवाल भाजपाच्या बाजूने असल्याचा दावा आहे.
वस्तुस्थिती काय - भाजपापेक्षा शिंदेसेनेकडे आमदारांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात तीन आमदार असले, तरी हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ जालना लोकसभेत आहे. शहरात संघटन मजबूत; परंतु ग्रामीण भागात कमजोर.
आज प्रदेशाध्यक्ष घेणार ऑनलाइन बैठक...
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २ एप्रिल रोजी सायंकाळी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेणार आहेत. या बैठकीत औरंगाबादचे पदाधिकारी आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचे समजते.
तर दिल्लीला जाऊ...
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी परवानगी दिली तर आम्ही दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडण्याची तयारी केली आहे. जागा भाजपाला सुटेल, हा विश्वास कायम आहे.
- शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजपा