भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:29 PM2024-11-13T16:29:42+5:302024-11-13T16:30:05+5:30
विकास कामांवरील चर्चेऐवजी आरोप-प्रत्यारोपच होऊ लागले
- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : वैजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने निलंबित केलेले अपक्ष उमेदवार एकनाथ जाधव यांनी जोरदार प्रचार सुरू केल्याने शिंदे सेनेचे उमेदवार आमदार रमेश बोरनारे यांनी डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी हे महायुतीतील दुफळीचा फायदा घेण्यासाठी सरसावले आहेत.
वैजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे उमेदवार आमदार रमेश बोरनारे, महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी आणि भाजपचे बंडखोर उमेदवार एकनाथ जाधव यांच्यात तिरंगी लढत आहे. या निवडणुकीत विविध कारणांमुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरणार असून या निवडणुकीत विकास कामांवर चर्चा होण्याऐवजी उमेदवार एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी व महायुती एकमेकांच्या सत्ता काळातील बऱ्या-वाईट कामांचा पाढा वाचत आहेत. त्यातून तालुक्याचा विकास आणि रोजगार या मुद्द्यावर बोलण्याऐवजी एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत.
आमदार बोरनारे यांना गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतानुसार ही निवडणूक तारेवरची कसरत ठरत आहे. माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या हयातीत बोरनारे यांच्यासाठी डॉ. दिनेश परदेशी व एकनाथ जाधव या दोघांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह महायुतीचा धर्म पाळत एकनिष्ठेने काम केले होते. परदेशी यांनी गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार निवडणुकीत माघार घेतली होती. यंदाही महायुतीचा हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे परदेशी यांनी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. तर भाजपाकडून इच्छुक एकनाथ जाधव यांनी बंडखोरी केल्याने बोरनारे यांची डोकेदुखी वाढली आहे. नगरपालिकेत गेली २५ वर्षे एकहाती सत्ता असलेले परदेशी यांनी बोरनारे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. मतदारसंघात ३ हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याकडे बोरनारे यांनी मतदारांचे लक्ष वेधले आहे. नारंगी मध्यम प्रकल्पासाठी पालखेड डाव्या कालव्याचे रुंदीकरण, रस्ते, पाणीपुरवठा, समाज मंदिरे, सामाजिक सभागृह अशी लोकप्रतिनिधींची कामे केल्याचा त्यांचा दावा आहे, तर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या तिंरगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
जाधव यांनी बोरनारे यांचा सुरू केला पिच्छा
यंदाची विधानसभा निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचे भाजपाचे अपक्ष उमेदवार एकनाथ जाधव यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती; परंतु महायुतीत ही जागा शिंदेसेनेकडेच कायम राहिल्याने जाधव हे कमालीचे दुखावले. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर घेतल्याचे दिसत आहे. ज्या गावामध्ये महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या सभा होत आहेत, त्याच गावात त्याच ठिकाणी काही वेळानंतर किंवा दुसऱ्याच दिवशी ते सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांनी बोरनारे यांचा एक प्रकारे पिच्छाच सुरू केल्याची चर्चा आहे.