जिल्ह्यातील १४३५ पाणीपुरवठा योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:00 AM2017-07-19T01:00:48+5:302017-07-19T01:02:39+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १४३५ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरण कंपनीने ९ ते १९ मे दरम्यान औरंगाबाद परिमंडळातील सुमारे ९०० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १४३५ पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कापले आहे. ५७ कोटी ९३ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी कंपनीने पाणीपुरवठा योजनांना कारवाईचा शॉक दिला आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.
या पाणीपुरवठा योजनांच्या बिलांबाबत जिल्हा परिषदेने गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंचांवर जबाबदारी टाकून हात वर केले आहेत, तर महावितरण कंपनीने व्याज व दंडाची रक्कम वगळता मूळ वीज बिल भरले तरच वीजपुरवठा सुरळीत करण्याची भूमिका घेतल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले, जि. प. सीईओंना भेटून वीज बिलांची मागणी केली होती. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बिल देण्यासाठी त्यांना मागणी केली; परंतु त्यांनी आमच्या मूळ वीज बिल मागणीकडे जि. प. सीईओंनी लक्ष दिले नाही.
बहुतांश ग्रामपंचायतींनी वीज बिलाची रक्कम भरलेली नाही. २३७७ कनेक्शन दोन जिल्ह्यांत आहेत. त्यातील १२६ योजनांनी वीज बिल भरले, तर १४३५ कनेक्शनचे वीज बिल कापण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित असतानाही काही पाणीपुरवठा योजना सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. नवीन कनेक्शन घेऊन त्या योजना सुरू आहेत काय, त्याकडेही कंपनी लक्ष देत आहे. ४३१ औरंगाबाद आणि १००४ जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना बंद आहेत. ५७ कोटींच्या थकबाकीमध्ये १९ कोटींचे व्याज असल्याचे त्यांनी नमूद केले.