शिर्डीत विमान कंपन्या वेटिंगवर; औरंगाबादमध्ये करावी लागते प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 01:34 PM2019-04-20T13:34:30+5:302019-04-20T13:36:12+5:30
याठिकाणी १२ विमानांची ये-जा होत आहे
औरंगाबाद : राज्य आणि केंद्र शासनाकडून झुकते माप मिळाल्याने अवघ्या दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावर विमानांची गर्दी वाढली आहे. याठिकाणी १२ विमानांची ये-जा होत असून, अनेक कंपन्या विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत. मात्र, आता मर्यादित सेवांमुळे कंपन्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे औरंगाबादहून नव्या विमानसेवांची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
शिर्डी विमानतळाचे १ आॅक्टोबर २०१७ रोजी उद्घाटन झाले होते़ उद्घाटनानंतर मुंबई व हैदराबाद सेवा नियमित सुरू झाली़ अवघ्या दीड वर्षातच शिर्डी विमानतळावर विमानसेवेचा विस्तार झाला. याठिकाणी १२ विमानांचे उड्डाण होत आहे. यामध्ये ९ विमानांचे दररोज उड्डाण होत आहे. एअर इंडिया, स्पाईस जेट, अलायन्स एअर या कंपन्यांमुळे दिल्ली, मुंबई, चेन्नई, भोपाळ, हैदराबाद, बंगळुरू शहरांबरोबर शिर्डी जोडले गेले आहे. याठिकाणी इंडिगो, गो एअरसारख्या कंपन्या सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत; परंतु त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
सोयी-सुविधांचा विस्तार करून शिर्डीहून यापुढेही आणखी इतर ठिकाणांसाठी सेवा सुरूहोतील. मात्र, शिर्डी विमानतळाचा औरंगाबाद विमानतळास निश्चित फटका बसत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले, तरीही येथील प्रशासन जागे होण्यास तयार नाही. जेट एअरवेज बंद झाल्याने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या एअर इंडिया आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा उरलीआहे. त्यामुळे औरंगाबादेतील पर्यटन, उद्योग, व्यवसायावर परिणाम होत आहे. औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी आता ठोस प्रयत्नांची गरज आहे, अन्यथा औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हीचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.
क्षमता आणखी वाढविणार
शिर्डी विमानतळावरून १२ विमानांचे उड्डाण होत आहे. यात दररोज ९ विमानांची ये-जा होते. सध्याचे टर्मिनल छोटे आहे. त्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत मोठे टर्मिनल होईल. नाईट लँडिंग सुविधाही सुरू होईल. त्यातून २४ तास सेवा देता येईल. इतर कंपन्यांकडून विचारणा होत आहे; परंतु सध्या सेवा मर्यादित ठेवली आहे. क्षमता वाढून सेवेचा आणखी विस्तार केला जाईल. - दीपक शास्त्री,संचालक, शिर्डी विमानतळ