औरंगाबादच्या घाटी रुग्णालयास पावले शिर्डी संस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:15 AM2018-04-24T00:15:54+5:302018-04-24T00:17:53+5:30
घाटी रुग्णालयास शिर्डी संस्थान पावले असून, एमआरआय मशीनसाठी १५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. घाटीने फे ब्रुवारीत एमआरआय मशीनसाठी शिर्डी संस्थानला साकडे घातले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयास शिर्डी संस्थान पावले असून, एमआरआय मशीनसाठी १५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. घाटीने फे ब्रुवारीत एमआरआय मशीनसाठी शिर्डी संस्थानला साकडे घातले होते.
घाटीत ६४ स्लाईड आणि ६ स्लाईड, अशी दोन सिटी स्कॅन, एमआरआय मशिन्स आहेत.
या यंत्रांमुळे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे; परंतु या यंत्रांना अनेक वर्षे झाल्याने ती वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे नवीन सिटी स्कॅनसह एमआरआय मशीन मिळण्याची मागणी घाटी प्रशासनाने केली. त्यासंदर्भात शासनाला प्रस्तावही दिला. शहरात ५ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५.५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. याच वेळी शिर्डी संस्थानकडून एमआरआय मशीन मिळवून दिले जाईल, असे सांगण्यात आले.
यानुसार क्ष-किरण विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा रोटे आणि इतर तज्ज्ञांनी शिर्डी संस्थानचे अधिकारी, तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला होता. अखेर शिर्डी संस्थानच्या व्यवस्थापन समितीने १५ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. यातून ३-टेलसा एमआरआय स्कॅनर मशीनची खरेदी करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळताच मशीन खरेदी प्रक्रिया होईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.