चार हजार जणांचे व-हाड जाणार शिर्डीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:40 PM2018-10-16T21:40:59+5:302018-10-16T21:42:31+5:30
शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे.
विजय सरवदे
औरंगाबाद : शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्चून राज्य परिवहन मंडळाच्या ८० बसेस आरक्षित केल्या आहेत.
शुक्रवारी श्रीसाई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आहे. या कार्यक्रमाचा मुहूर्त साधून राज्य सरकारने शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घरकुलांच्या ई- प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले आहे. राज्य सरकारने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी दिसली पाहिजे म्हणून की काय, प्रत्येक जिल्ह्यातून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारी पैशातून नेले जाणार आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. यापैकी २ हजार घरकुलांचे लाभार्थी व त्यांच्यासोबत प्रत्येकी एक नातेवाईक असे एकूण ४ हजार जणांना शिर्डीला नेण्यासाठी सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
शिर्डीला नेण्यात येणारे २ हजार लाभार्थी व त्यांचे २ हजार नातेवाईक, अशा ४ हजार नागरिकांच्या प्रवासासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ८० बसेस आरक्षित केल्या आहेत. बस व नाश्ता-पाण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला शासनाकडून निधीदेखील प्राप्त झाला आहे. प्रती बस १५ हजार रुपयांप्रमाणे ८० बसेससाठी १२ लाख रुपये व सरकारी वºहाडाच्या नाश्ता- पाण्यासाठी वेगळा निधी मिळाला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच परिवहन मंडळाच्या बसेस तालुका तसेच मोठ्या गावांमध्ये दाखल होतील. तेथून शिर्डीला नेण्यात येणारे लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांना बसमध्ये घेऊन जाण्यासाठी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंते व अन्य सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या उपक्रमावर गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे.
जिल्ह्यात सहा हजार घरकुले पूर्ण
यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेला सन २०१६-१७ पासून प्रारंभ झाला. सन २०२२ पर्यंत २१ हजार ३०६ घरकुले उभारली जाणार आहेत. तीन वर्षांत १० हजार २०५ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, आजपर्यंत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. घरकुल उभारण्यासाठी प्रती लाभार्थी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान टप्प्या टप्प्याने दिले जाते.