कोरोनामुक्त गाव योजनेत बक्षीस मिळविण्यासाठी शिऊर ग्रामस्थ एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:05 AM2021-06-25T04:05:22+5:302021-06-25T04:05:22+5:30
शिऊर गाव हे वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. गावाने कोरोनाविरुद्ध दिलेला लढा, कोरोना योद्ध्यांचे अथक परिश्रम या जोरावर ...
शिऊर गाव हे वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. गावाने कोरोनाविरुद्ध दिलेला लढा, कोरोना योद्ध्यांचे अथक परिश्रम या जोरावर शिऊर गावात रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली. व्यापारी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांचे लाभलेले सहकार्य या जोरावर गावाने कोरोनामुक्त गाव योजनेत पाहिले बक्षीस मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था, ग्रामपंचायत शिऊर, यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेला तडीस नेले जाणार असून यासंदर्भात जे. के. जाधव यांनी मागील आठ दिवसांत, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ, आशा व अंगणवाडी सेविकांची तसेच स्वयंसेवकांची बैठक घेऊन बक्षीस मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यामध्ये लसीकरण समिती, वाहन समिती, सर्व्हेक्षण समिती इत्यादी समित्या शासनाच्या आदेशाप्रमाणे तयार केल्या असून प्रत्यक्षात कामे सुरू करण्यात आली आहेत.
असे असणार बक्षिसाचे स्वरूप
या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर ५ पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवायचे आहेत. स्पर्धेत सहभागी गावांना विविध २२ निकषांवर ५० गुण देण्यात येणार आहेत.