शिवजयंतीच्या मिरवणुकीने लक्ष वेधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:34 AM2018-03-05T00:34:54+5:302018-03-05T00:35:03+5:30
‘जयभवानी जय शिवाजी’ असा जयघोष करीत रविवार, ४ मार्च रोजी शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी राजाबाजार येथून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘जयभवानी जय शिवाजी’ असा जयघोष करीत रविवार, ४ मार्च रोजी शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी राजाबाजार येथून निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले.
राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोरून सायंकाळी ७ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. यात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांची अश्वारूढ स्वारीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यापाठीमागे भगवे फेटे घातलेल्या मुली शिस्तीत लेझीम खेळत होत्या. एका सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. त्यामागे एका वाहनामध्ये सुमारे १० फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ठेवण्यात आला होता. या पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका वाहनामध्ये शिवाजी महाराजांचा दरबाराचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता. तर दुस-या वाहनात माता जिजाबाई बालशिवाजीला मार्गदर्शन करीत असल्याचा सजीव देखावाही लक्षवेधी ठरला. सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. बँडपथकांनी देशभक्तीपर गीत सादर करून मिरवणुकीत रंगत आणली. मिरवणुकीच्या प्रारंभी खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र आदमाने, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, मकरंद कुलकर्णी, यशश्री बाखरिया, आनंद तांदुळवाडीकर, प्रफुल्ल मालाणी, विश्वनाथ स्वामी, बद्रीनाथ ठोंबरे आदींची उपस्थिती होती. मिरवणूक शहागंज, गांधी पुतळा चौक, सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, पैठणगेटमार्गे क्रांतीचौकात पोहोचली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा-देवळाई परिसरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.