छत्रपती शिवाजी महाराजांचा होता औरंगाबादेत मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:17 PM2020-02-19T13:17:50+5:302020-02-19T13:28:52+5:30
छत्रपती शिवाजी महाराज जयंती : दिल्लीला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज थांबले शहरात
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगाबादेत मुक्काम केला होता. महाराजांचे चरण या ऐतिहासिक भूमीला लागले होते. त्यावेळेस छत्रपतींना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याची माहिती ऐतिहासिक दस्तावेजांवरून स्पष्ट होत आहे.
तत्कालीन औरंगाबाद शहरात शिवाजी महाराज जयसिंगपुऱ्यातील एका हवेलीमध्ये थांबले होते. ती जुनी हवेली सध्या अस्तित्वात नाही. तेथे एक अपार्टमेंट बांधले गेले आहे. मात्र, जिथे महाराजांनी पूजा केली होती ते मंदिर आजही त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभे आहे.
छत्रपती शिवाजी राजे व मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला. राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर शिवछत्रपतींनी आगरा येथे बादशहा औरंगजेबाच्या भेटीला जाण्याचे मान्य केले. त्यानुसार ५ मार्च १६६६ मध्ये राजगडाहून शिवाजी महाराज आगऱ्याला जाण्यासाठी निघाले. त्यांनी आपले पुत्र संभाजी महाराज यांना सोबत घेतले. संभाजीराजांचे वय अवघे ९ वर्षांचे होते. सोबत निवडक मनसबदार, घोडेस्वार आणि पायदळ घेऊन शिवछत्रपतींची स्वारी पुणे, अहमदनगर मार्गे औरंगाबादेत दाखल झाली होती. औरंगजेबाने दख्खनची सुभेदारी त्यावेळी मिर्झा राजे जयसिंग यांना दिली होती. त्यांच्या निवासासाठी मकाईगेट परिसरात भव्य हवेली बांधली होती. असे म्हणतात की, या हवेलीचे बांधकाम राजस्थानी शैलीचे होते.
जयसिंगराजाच्या नावावरूनच सध्याचा जयसिंगपुरा ओळखला जातो. या जयसिंगपुऱ्यात ही हवेली होती. या हवेलीतच शिवाजी महाराज थांबले होते. ज्या शिवछत्रपतींची आपण ख्याती ऐकली त्या रयतेच्या राजाला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी त्यावेळेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, असे राजस्थानातील पुरातत्व विभागाच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या ‘पुरंदरचा तह’च्या दस्तावेजात लिहिण्यात आले आहे. तसेच बखरीमध्येही या घटनेचा उल्लेख आहे, असे इतिहास अभ्यासकांनी सांगितले.
शिवाजी महाराज व राजे जयसिंग हे शिवभक्त होते. राजे जयसिंग हवेलीच्या मागील बाजूस महादेव मंदिरात पूजेसाठी जात. त्याच महादेव मंदिरात शिवाजी महाराजांनी पूजा केली होती. तसेच या परिसरातील विठ्ठल रु क्मिणी मंदिरातही महाराजांनी दर्शन घेतले होते. औरंगाबादेतील मुक्कामानंतर महाराज बुºहाणपूर, भोपाळ मार्गे आगऱ्याला पोहोचले होते. उपलब्ध दस्तावेजानुसार महाराजांनी राजगड ते आगरा हा प्रवास ६६ दिवसांत पूर्ण केला.
एवढेच नव्हे तर येथील महादेव मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्यांनी पूजाही केली होती. महाराजांनी मुक्काम केलेली ती हवेली सध्या अस्तित्वात नाही. तेथील शिवमंदिर अजूनही त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत दिमाखात उभे आहे.
दस्तावेजामध्ये महाराजांच्या शाहीस्वारीचे सजीव वर्णन
महाराजांना पाहण्यासाठी तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असंख्य लोक जमले होते. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सैन्य थोडेच होते; पण शानदार होते. एक हत्ती उंच झेंडा घेऊन अग्रभागी चालत होता. महाराजांच्या पालखीला चांदीचे आवरण होते. या पालखीच्या पुढे व मागे संरक्षण करणारे घोडेस्वार व पायदळ सैनिक. या महाराजांच्या शाहीस्वारीचे सजीव वर्णन राजस्थानमधील दस्तावेजामध्ये करण्यात आले आहे. महाराजांच्या स्वागतासाठी त्यावेळचा येथील सुभेदार सफ शिकन खान आला नव्हता. त्याने आपल्या पुतण्याला पाठविले व महाराजालाच भेटायला बोलाविले. यामुळे शिवाजी महाराजांना शिकन खानचा राग आला आणि ते जयसिंगराजाच्या हवेलीकडे निघून गेले. खानाला आपली चूक लक्षात आली व नंतर तो शिवाजी महाराजांना भेटण्यास जयसिंगराजाच्या हवेलीत गेला होता. त्याच्यासोबत काही मुगल अधिकारीही होते. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुभेदार खानची भेट घेतली होती. औरंगाबादच्या मुक्कामात शिवछत्रपतींनी काही मंदिरांत व येथील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या होत्या. शिवछत्रपतींच्या आगमनामुळे त्यानंतर जयसिंगपुरा सर्वत्र प्रसिद्ध झाला.