शिवजयंती आपला सण आणि हिंदू सण तिथीनुसारच साजरे होतात : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:47 PM2020-03-12T12:47:34+5:302020-03-12T12:48:09+5:30
वर्षाचे ३६५ दिवस शिवजयंती साजरी करा
औरंगाबाद : सर्व हिंदू सण तिथीनुसार साजरी होतात मग शिवजयंती तारखेनुसार का ? शिव जयंती हा आपला सण आहे यामुळे शिवजयंती तारखे ऐवजी तिथीनुसार साजरी करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते क्रांती चौक येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवजयंती उत्साहात बोलत होते.
तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे शहरात आले आहेत. क्रांती चौक येथे मनसेतर्फे शिव जयंती साजरी करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान राज ठाकरे यांनी येथे शिव पूजन केले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, सर्व हिंदू सण तिथीनुसार साजरी होतात, शिवजयंती हा आपला सण आहे. यामुळे शिव जयंती सुद्धा तिथी नुसार साजरी करा असे आवाहन त्यांनी केले. शिव जयंती वर्षाचे ३६५ दिवस साजरी केली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, करोनो मुळे शिव जयंती शोभायात्रेस परवानगी नाकारण्यात आल्यावर ठाकरे यांनी टीका केली. तसेच संध्याकाळी शोभायात्रा निघेल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.