पालकमंत्र्यांना हटविण्यासाठी शिवसैनिकच झाले आक्रमक

By Admin | Published: August 19, 2016 12:40 AM2016-08-19T00:40:51+5:302016-08-19T00:59:41+5:30

उस्मानाबाद : आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र सावंत यांनी जिल्ह्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

Shiv Sainik became the aggressor to remove the Guardian Minister | पालकमंत्र्यांना हटविण्यासाठी शिवसैनिकच झाले आक्रमक

पालकमंत्र्यांना हटविण्यासाठी शिवसैनिकच झाले आक्रमक

googlenewsNext


उस्मानाबाद : आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र सावंत यांनी जिल्ह्याकडे फारसे लक्ष दिले नाही. याबाबत विरोधकांकडून सातत्याने टिका होत असतानाच इतकेच दिवस आपल्या पक्षाचे पालकमंत्री म्हणून चुप्पी साधलेल्या शिवसैनिकांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. दीपक सावंत यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अधिकारीराज सुरू असल्याचे आरोप करीत त्यांना तातडीने हटवून शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
कळंब तालुक्यातील तब्बल ११२ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत लेखी विनंती केली आहे. पालकमंत्री दीपक सावंत यांच्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना कमकुवत होत असल्याचे सांगत सर्वसामान्य जनतेची सोडा शिवसैनिकांचीसुद्धा कामे होत नसल्याची खंत या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. पालकमंत्री म्हणून सावंत यांनी जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. याबरोबरच कार्यकर्त्यांना ताकद देऊन सेनेची संघटनात्मक शक्ती वाढविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र शासकीय कार्यक्रम वगळता पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकत नाही. सेनेचे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या पदाधिकाऱ्यांच्याच ते संपर्कात असतात. याबाबतही जिल्ह्यातील शिवसैनिकात मोठी नाराजी आहे. मात्र आपण बोलल्यास आपल्याला कारवाईला सामोरे जावे लागेल म्हणून शिवसैनिकांसह अनेक पदाधिकारी याबाबत वाच्यता करीत नाहीत. सत्ता येऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी जिल्ह्यातील विविध समित्यांच्या नेमणुका अद्याप झालेल्या नाहीत. आरोग्यमंत्री जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून भेटल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारेल अशी आशा होती. मात्र जिल्हा रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांची अवस्था केविलवाणी झाली असून, जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ अधिकारीराज सुरू आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य हताश झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री दीपक सावंत यांना तातडीने हटवावे आणि त्यांच्या जागी शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करावा, अशी विनंतीही या शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या लेखी निवेदनात केली आहे. निवेदनावर विजय कवडे, अश्रुबा बिक्कड, गजानन चोंदे, निर्भय घुले यांच्यासह भैरवनाथ गुंजाळ, अमीर बागवान, बाळासाहेब काळे, इम्रान तांबोळी, अर्जुन जाधव, बाबुराव सावंत, तुकाराम बिडवे, विलास कवडे, पंडित ढोणे, सुखदेव सुरवसे आदींसह शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
न्याय मिळेना म्हणून उठवतोय आवाज
पक्षप्रमुखांना पाठविलेल्या या मागणी पत्रावर ११२ शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेले कार्यकर्ते असल्याने जिल्ह्यातील सत्यपरिस्थिती आपणापर्यंत पोहोचविणे आम्ही आमचे कर्तव्य मानतो असे नमूद करीत न्याय मिळत नसेल तर आवाज उठविलाच पाहिजे, अशी शिकवण आम्हाला बाळासाहेबांनीच दिली आहे. त्यामुळेच जिल्ह्यावर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आम्ही आपणाकडे दाद मागत असल्याचे नमून करीत आम्ही कालही शिवसेनेतच होतो आणि यापुढेही शिवसेनेतच राहू, अशी ग्वाहीही या शिवसैनिकांनी या पत्रामध्ये दिली आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्हा तीव्र दुष्काळ परिस्थितीचा सामना करीत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथेही शेतकऱ्याने आत्महत्या केली. खा. रवींद्र गायकवाड आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या गावास तात्काळ भेट देऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले; मात्र जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेल्या सावंत साहेबांना त्यांच्या व्यस्ततेमुळे या कुटुंबाची साधी चौकशीही करावी वाटली नाही, याची शिवसैनिक म्हणून आम्हाला खंत वाटते, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Shiv Sainik became the aggressor to remove the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.