मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकाने लिहिले थेट 'रक्तपत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:41 PM2022-06-28T17:41:43+5:302022-06-28T17:42:50+5:30
पैसे घेऊन आमदारांनी बंडखोरी केली आहे. सर्व सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.
औरंगाबाद: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसैनिक अस्वथ आहे. बंडखोरांचे समर्थक आणि ठाकरे समर्थक अशी विभागणी शिवसैनिकांत झाली आहे. बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिल्याची भावना सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहे. ठाकरे घराण्याशी निष्ठा दाखवत एका शिवसैनिकांने तर 'रक्तपत्र' लिहून उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे घराणे आणि शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, असा ठाम निर्धार कांबळे यांनी व्यक्त केला.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्यानंतर शिवसेनेत बंडखोरी करत पक्षात उभी फुट पाडली आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असून ही संख्या ५० जवळ जाईल असा दावा केला आहे. तसेच शिंदे यांनी माजी आमदार-खासदार, जुने शिवसैनिक यांना संपर्क करणे सुरु केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच पाईक असून खरे शिवसैनिक आम्हीच आहोत, असे म्हणत शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोरांनी पक्षातच वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, शिंदे सर्व बंडखोरांसह आसाममध्ये आहेत. तर दुसरीकडे राज्यात त्यांचे समर्थक विरुद्ध ठाकरे यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत.
पक्षातील भूकंपानंतर ठाकरे यांच्या आदेशाने यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेचे निषेध मेळावे सुरु केले आहेत. अस्वस्थ शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. शहरात तर चेतन कांबळे या कट्टर शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रक्तपत्र लिहिले आहे. पैसे घेऊन आमदारांनी बंडखोरी केली आहे. सर्व सामान्य शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. आज फक्त रक्ताने पत्र लिहिले आहे उद्या गरज पडली तर रस्त्यावर उतरून बंडखोरांना धडा शिकवू, असा इशारा चेतन कांबळे या शिवसैनिकाने दिला आहे.