मुंबईत परणाऱ्या बंडखोरांचे शिवसेना स्टाईलं 'स्वागत' करण्यास तयार; चंद्रकांत खैरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 07:05 PM2022-06-29T19:05:04+5:302022-06-29T19:06:08+5:30
इकडे पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत, तिकडे बंडखोर मजा करत आहेत
औरंगाबाद: राज्यात पाऊस लांबल्याने नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत, तर दुसरीकडे गुवाहाटीत बंडखोर आमदार मजा करत आहेत. काय डोंगर, काय हॉटेल म्हणणारे बंडखोर पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. त्या गद्दारांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला. आज सकाळी बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने शहरातून बाईक रॅली काढली यावेळी ते बोलत होते.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील पाच शिवसेना आमदारांचा समावेश आहे. यात एक कॅबिनेट , तर एक राज्यमंत्री आहे. सामान्य शिवसैनिक असलेल्या बंडखोरांना पक्षाने आमदारकीसह अनेक पदे दिली. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून आमदारांनी शिंदेयांच्या नेतृत्वात बंड केले. याबाबत शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. शिवसेनेन लागलीच बंडखोरांच्या मतदारसंघात निषेध मेळावे घेणे सुरु केले आहे. आज बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. बंडखोरांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर मुंबईत परत येताच त्यांचे 'स्वागत' करण्यास शिवसैनिक तयार आहेत,असा इशारा दिला.
राज्यात पाऊस लांबला तिकडे बंडखोर हॉटेलात
इकडे पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत, तिकडे गुवाहाटीत बंडखोर मजा करत आहेत. काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर, असे म्हणत बंडखोर तिकडे बसले आहेत. त्यांना नागरिकांची चिंता नाही. शहरातील बंडखोर आमदार तर कधीच सामान्य जनतेत गेले नाहीत. त्या गद्दारांना शिवसैनिक माफ करणार नाहीत, असेही खैरे यावेळी म्हणाले.
मतदारांना विश्वास, चुकीचे काम करणार नाही : संजय शिरसाट
दरम्यान, आज बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आ. संजय शिरसाट यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. आम्ही गुवाहाटी येथे स्वखुशीने असून, आम्हाला कोणीही संपर्क केलेला नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. मतदारांना विश्वास आहे की, आम्ही चुकीचे काम करणार नाहीत, असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केला. तसेच आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेतच राहू असेही आ. शिरसाट म्हणाले.