शिवसेनाही लागली लोकसभेच्या तयारीस; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात मेळावा
By बापू सोळुंके | Published: December 28, 2023 07:00 PM2023-12-28T19:00:38+5:302023-12-28T19:02:19+5:30
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीची तयारीसाठी शिवसेना शिंदे गटही सक्रीय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेचा मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री शिंदे फोडणार आहेत.
शिवसेनेला मुंबईनंतर मराठवाड्यातील जनतेने सर्वाधिक प्रेम दिले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गतपंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले होते. यात शिवसेनेच्या सहा आमदारांचा समावेश आहे. त्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जिल्ह्यातील पाच आमदार आहेत.
यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. यात शिवसेनेनेही मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विधानसभा मतदार संघानिहाय पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला होता. गतपंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातून निसटलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेकडून अनेक जण इच्छुक आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नाव यात आघाडीवर आहे. यापार्श्वभूमीवर अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा ते घेणार आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची शक्यता आहे.