शिवसेना-भाजप युती बॅकफूटवर
By Admin | Published: June 16, 2016 12:02 AM2016-06-16T00:02:18+5:302016-06-16T00:16:41+5:30
औरंगाबाद : महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद : मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेतल्याच्या मुद्यावर मंगळवारी महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. युतीची मागणी आयुक्तांनी सपशेल फेटाळून लावली. आयुक्तांना परत शासन दरबारी पाठविण्याची भाषाही करण्यात आली. बुधवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी ‘अगा जे घडलेच नाही...’ प्रमाणे आयुक्तांसोबत नियमित कामकाज सुरू केले.
शहरातील नागरिकांनी आणि काही व्यापाऱ्यांनी २९० कोटी रुपये मालमत्ता कराचे थकविले आहेत. थकबाकी वसूल करण्यासाठी ८ जून रोजी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे बैठक आयोजित केली. बैठकीत थकबाकी भरावी, काही अडचण असल्यास मनपाच्या कर अदालतीत प्रश्न सुटेल असे सांगण्यात आले. थकबाकीदारांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्यात आली. मनपाचा कायदा श्रेष्ठ असताना पोलिसांचे सहकार्य कशासाठी घेण्यात आले आदी मुद्दे उपस्थित करीत शिवसेना-भाजप युतीने मंगळवारी सर्वसाधारण सभेत मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आयुक्त जेरीस येत नसल्याचे पाहून सभा बरखास्त करण्यात आली. (पान २ वर)
इतिहासात प्रथमच
मागील अडीच महिन्यात मनपाने २० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. मनपाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर कधीच वसूल झालेला नाही.
४मागील आठ दिवसांपासून थकबाकी जमा करणाऱ्यांनीही रांग लावली आहे. बुधवारी मनपाच्या विविध वॉर्ड कार्यालयांमध्ये सुमारे १ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.
मालमत्ता कर आॅनलाईन भरण्यासाठी एचडीएफसी या बँकेच्या सहा शाखांमध्ये यापूर्वीच सोय करण्यात आली आहे. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शहरातील आणखी ११ बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. बुधवारी बँक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. आठ दिवसांमध्ये जिथे बँक तिथे कर भरण्याची सोय उपलब्ध होईल. याशिवाय सहा वॉर्ड कार्यालयांमध्ये वसुली कर्मचाऱ्यांना कर भरण्यासाठी एक मशीन देण्यात येईल. डेबिट कार्डच्या माध्यमानेही नागरिक कर भरू शकतील.
जप्तीची मोहीम
1थकबाकी आणि चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर जमा करण्यासाठी मनपा प्रशासन चांगलेच सरसावले आहे. ठिकठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मनपाच्या रेल्वेस्टेशन व्यापारी संकुल येथील एकूण ७ दुकानांना सील ठोकण्यात आले.
2व्यापाऱ्यांकडून ४ लाख ६१ हजार रुपये थकबाकी वसूल केल्यानंतर सील उघडण्यात आले. ही कारवाई उपायुक्त अय्युब खान यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना सहसंचालक वसंत निकम, मालमत्ता अधिकारी ए. बी. देशमुख, वामन जोगदंड, हसन खान, हरिभाऊ पवार, शिवाजी ढोके, सचिन गायकवाड, शेख जाकेर, शेख सालम आदींनी केली.
...म्हणून घेतली नरमाईची भूमिका
आयुक्तांना सर्वसाधारण सभेत कोंडीत पकडण्यासाठी मोजकेच नगरसेवक सरसावले होते. पदाधिकारी वारंवार प्रशासनाची बाजू घेत होते. कारण २३ जूनपासून शहर विकास आराखड्याची सुनावणी घेण्यात येणार आहे. आयुक्तांशी पंगा घेतल्यास भविष्यात आपल्यालाच त्रास होईल, याची जाणीव पूर्णपणे पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांनी नरमाईची भूमिका घेतली.