'संभाजी महाराज विमानतळ'साठी शिवसेना-भाजप सोबत; देसाई-कराड भेटले केंद्रीय मंत्री शिंदेंना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 03:40 PM2022-05-17T15:40:02+5:302022-05-17T15:57:59+5:30
शहर नामांतर मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना विमानतळाच्या नामांतरावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.
औरंगाबाद: शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून शिवसेनाविरुद्ध भाजप, मनसे असा वाद पुन्हा पेटला आहे. या विषयावरून विरोधकांनी वेळोवेळी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजीमहाराज करण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याचे चित्र आज दिसले. शिवसेना नेते , उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विमानतळ नामांतराच्या मुद्द्यावर आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सुद्धा सोबत होते.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने शिवसेनेला कोंडीत करण्याची एकही संधी सोडली नाही. मागील काही दिवसांपासून यात मनसेने सुद्धा उडी घेतली आहे. यातच औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून भाजप आणि मनसेने शिवसेनेवर जोरदार टीका सुरु केल्याने शिवसेना काहीशी मागे गेल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आम्ही सुरुवातीपासून संभाजीनगरचा म्हणतो, नामकरण करण्याची गरज नाही अशी भूमिका स्पष्ट केली. यानंतर भाजप आणि मनसे यांनी शिवसनेवर हल्ला सुरु केला आहे. मात्र, शहरासोबत विमानतळाचे नामकरण हा मुद्दा ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्र शासनाच्या अधिकारात येणारा हा मुद्दा आता शिवसेनेने हाती घेतला असून उद्योगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. देसाई यांनी मंत्री सिंधिया यांना एक निवेदन देत विमानतळ नामकरण, धावपट्टी विस्तार आदी विषयांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची देखील उपस्थिती होती. शहराच्या नामांतरावरून विरोधात असणारे विमानतळाच्या नामांतरावर मात्र सोबत दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
To rename Aurangabad Airport to ‘Chhatrapati Sambhaji Maharaj & various other projects, the Minister of Industries,Shri @Subhash_Desai called upon the Union Civil Aviation Minister, Shri @JM_Scindia today at Rajiv Gandhi Bhavan. GoI’s Finance MoS, @DrBhagwatKarad was also present pic.twitter.com/fIlvHvNbmS
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) May 17, 2022
काय केली मागणी
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिलेल्या निवेदनात औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजीमहाराज विमानतळ करणे, येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणे अशा मागण्या आहेत. यासोबतच विमानतळाची धावपट्टी विस्तारावर देखील या भेटीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. शहर नामांतर मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना विमानतळाच्या नामांतरावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.