औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आतापासूनच शिवसेना-भाजपत खेचाखेची;दोन्ही पक्षांच्या इच्छुकांत सोशल वॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:41 PM2022-04-21T19:41:05+5:302022-04-21T19:42:07+5:30
महाविकास आघाडीचा कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विजयाचा पॅटर्न यशस्वी झाल्याने सेनेच्या अपेक्षांना पाझर
औरंगाबाद : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाल्यामुळे आगामी विधानसभेत असाच पॅटर्न तिन्ही पक्षांकडून राबविला जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या चर्चेत शिवसेनेच्या अपेक्षांना पाझर फुटला असून आतापासूनच शिवसेना पूर्व मतदारसंघात कामाला लागली आहे. भाजपच्या प्रत्येक डावपेचाला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. विधानसभा तर दूरच; परंतु महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांमध्येही सोशल वॉर सुरू आहे. यात दोन्ही पक्षांचे इच्छुक आघाडीवर आहेत.
आंदोलने, होर्डिंग्ज वॉर, पाणीपुरवठ्यावरून सुरू असलेल्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये खेचाखेची सुरू झाली आहे. जिथे भाजपचे आंदोलन, तेथे शिवसेनेचे सोल्यूशन असा प्रकार सुरू असून आगामी काळात हे प्रमाण आणखी वाढेल, असे चित्र सध्या तरी आहे. याशिवाय महापुरुषांच्या जयंती, महाप्रसाद, विविध समाजोपयोगी शिबिर घेण्यासाठी दोन्ही पक्षांत स्पर्धा लागलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघात सध्या तरी कुठेही दिसत नाही. तर एमआयएमचे त्यांच्या ‘व्होट पॉकेट’मध्ये काम सुरू आहे.
२००९ पासून २०१९ पर्यंत झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकदा तर भाजपला दोन वेळा विजय मिळाला आहे. यात शिवसेनेला आजवर संधी मिळालेली नाही. त्यामुळे २०२४ मध्ये शिवसेनेकडून संधी मिळण्यासाठी माजी सभापती राजू वैद्य तयारी करीत आहेत. तर विद्यमान भाजपचे आ.अतुल सावे यांचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीने एकत्रित येण्याचे संकेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विजयामुळे मिळाल्यामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या असून वैद्य यांनी यंदाच्या वाढदिवसाला पूर्ण जाेर लावला.
आ. सावेंचे चार कोटी तर वैद्य यांचे साडेतीन कोटी
आ. अतुल सावे यांनी मतदारसंघात चार कोटी रुपयांची विकासकामे सरलेल्या आर्थिक वर्षात केली. तर राजू वैद्य यांनी देखील पक्ष आमदारांकडून साडेतीन कोटींचा निधी मतदारसंघात आणला. विकासकामांच्या या स्पर्धेत नागरी सुविधांमध्ये वाढ होत असली तरी २०२४ मध्ये काय समीकरण असेल, त्यावर सगळे काही अवलंबून आहे. सध्या मात्र दोन्ही पक्षांत प्रत्येक कार्यक्रम, आंदोलनावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते आहे.