औरंगाबाद ‘मध्य’ मतदारसंघावरून सेना-भाजपा अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 07:39 PM2019-09-11T19:39:17+5:302019-09-11T19:41:14+5:30
युतीचं ठरलंय? : जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे लागले सर्वांचे लक्ष
- विकास राऊत
औरंगाबाद : शिवसेना-भाजपा महायुतीच्या सध्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. बैठकीत जागा वाटपासाठी आकडेमोडीचे फॉर्म्युले चर्चेत येत आहेत. जागावाटपात कुणाची बाजू वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक मतदारसंघांतील युतीच्या इच्छुकांमध्ये मात्र चलबिचल वाढली असून, औरंगाबाद शहरातील ‘मध्य’ मतदारसंघ त्यापैकी एक आहे.
युती झाल्यास सदरील मतदारसंघ कुणाकडे जाणार यावरून इच्छुक दावेदारी करू लागले आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती तुटली. भाजपकडून किशनचंद तनवाणी, तर शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल मैदानात होते. दोघांमध्ये मतविभाजन झाल्याने एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना आमदार होण्याची संधी मिळाली. त्यामुळे यावेळी युती झाली, तर ‘मध्य’ची जागा सेना किंवा भाजपाला सुटली, तर तुल्यबळ लढत होईल.
युती तुटली तर पुन्हा चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. युतीसमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत मध्य मतदारसंघात मतदारांची संख्यादेखील वाढली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ३ लाख १९ हजार ६४५ मतदारसंख्या होती. त्यामध्ये आणखी काही भर पडणार आहे. १ लाख ६५ हजार १५३ पुरुष, तर १ लाख ५४ हजार ४९४ महिला मतदार मतदासंघात आहेत. २०१४ च्या तुलनेत ८३ हजार ५६७ मतदार वाढले. त्यात आणखी भर पडणार आहे. वाढलेल्या मतदारसंख्येनुसारदेखील विजयाची गणिते बदलण्याची शक्यता आहे.
२०१४ साली काय झाले होते निवडणुकीत
२०१४ साली खा. इम्तियाज जलील यांना ६१ हजार ८४३ मते मिळाली होती. ३१ टक्के मतांचे ते प्रमाण होते. शिवसेनेचे उमेदवार जैस्वाल यांना ४१ हजार ८६१ मते मिळाली होती. २५ टक्के मतांचे ते प्रमाण होते. भाजपचे उमेदवार तनवाणी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ४० हजारांच्या आसपास मते होती. शिवसेनेत तनवाणी विरुद्ध जैस्वाल गट, अशी फूट पडल्याचा फटका जैस्वाल यांना बसला होता. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे युतीत जागावाटपात ‘मध्य’ची जागा शिवसेनेकडेच राहील, असा युक्तिवाद कार्यकर्ते, पदाधिकारी करीत आहेत, तर मतदारसंघाच्या अदला-बदलीत भाजपाला ‘मध्य’ मिळेल, अशी आशा इच्छुकांना आहे.
अशी आहे दावेदारी
माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मध्य मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्या मतदारसंघातून शिवसेनाच उमेदवार देईल, असे सोशल मीडियातून मध्यंतरी जाहीर केले, तर भाजपाचे प्रबळ दावेदार असलेले किशनचंद तनवाणी यांनी मतदारसंघ युतीमध्ये कुणाला सोडायचा, याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. ‘मध्य’मधील दावेदारांचा सगळा खेळ युती होण्यावर आणि जागा कोणत्या पक्षाला सुटते, यावर अवलंबून आहे.