सत्तार यांच्या बंडाने शिवसेना तोंडघशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:33 AM2020-01-05T06:33:05+5:302020-01-05T06:33:18+5:30
विधानसभेचे सहा व विधान परिषदेचा एक, असे सात आमदार असताना शनिवारी औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडली.
औरंगाबाद : विधानसभेचे सहा व विधान परिषदेचा एक, असे सात आमदार असताना शनिवारी औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडली. असंगासी संग केला की हाती धुपाटणे येते, अशी सेनेची अवस्था झाली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मीना शेळके व शिवसेनेच्या बंडखोर देवयानी डोणगावकर यांना प्रत्येकी ३० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यात शेळके विजयी ठरल्या. उपाध्यक्षपदासाठी भाजपचे लहानू गायकवाड व शिवसेनेच्या शुभांगी काजे यांच्यातील लढतीत महाविकास आघाडीची दोन मते फुटल्याने भाजपचा विजय झाला.
महाविकास आघाडीकडे संख्याबळ असूनही सेनेत आलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीमुळे उपाध्यक्षपद भाजपकडे गेल्याने सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला; आयारामांनीच येथे शिवसेनेचा ‘गेम’ केला. शिवसेनेत येऊन अध्यक्ष बनलेल्या देवयानी डोणगावकरांनी बंडखोरी करून सेनेला प्रारंभीच धक्का दिला. त्यातून सावरत असताना सत्तारांनी ६ समर्थकांना बंडखोरांच्या दावणीला बांधले. सेनेतील अंतर्गत हाणामारीला येथूनच प्रारंभ झाला.
सत्तार यांनी वाहिन्यांद्वारे आपल्या राजीनाम्याची बातमी पेरल्याने फायर फायटर म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर धावत आले. सत्तार राजीनामा देणार नाहीत. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, अशी सारवासारव त्यांनी केली; पण तोपर्यंत या स्वपक्षीयांच्या बंडखोरीने सेनेचे व्हायचे ते नुकसान झाले. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मीना शेळके केवळ चिठ्ठीमुळे विजयी झाल्या, तरी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मते फुटली आणि भाजपचा विजय झाला.
डोणगावकर व सत्तार हे खरे शिवसैनिक नसल्याने सेनेत खळबळ उडाली. डोणगावकरांना अध्यक्ष व किशोर बलांडे यांना उपाध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर नियंत्रण कायम ठेवण्याची सत्तारांची खेळी अयशस्वी झाली. या खेळीत सेनेच्या हाती धुपाटणे आले.
या पराभवाला शिवसेनेतील खैरे-दानवे गटबाजीही कारणीभूत आहे. उपाध्यक्षपदी उमेदवार शुभांगी काजे या खैरेंच्या उमेदवार होत्या. दानवे गटाला त्यांचा विजय परवडणारा नव्हता. मतदारसंघात प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये म्हणून अध्यक्ष व उपाध्यक्षपद आपल्याकडे नसावे, असा शिवसेनेच्या सर्वच आमदारांचा प्रयत्न होता. जिल्ह्यात सेनेत आ. दानवे यांचे वर्चस्व असल्याने त्यांना खैरेंचा हस्तक्षेप नको होता.
>सत्तार यांनी सेनेतील ‘बिभीषणा’च्या मदतीने ही खेळी खेळली; पण हा बिभीषण कोण, याचा शोध सेनेलाच घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यावर सत्ता असताना जिल्हा परिषदेची सत्ता राखता न येणे हीच नामुष्की सेनेवर आली आहे.