उद्धव ठाकरे हे अर्जुन खोतकरांसाठी श्रीकृष्णासारखे आहेत; ईडीला घाबरु नका, चंद्रकांत खैरेंचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 01:29 PM2022-07-26T13:29:15+5:302022-07-26T13:32:04+5:30
ईडीला घाबरु नका, असा सल्ला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अर्जुन खोतकर यांना दिला आहे.
औरंगाबाद- गेल्या दोन दिवसांपासून माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर दिल्लीत आहेत. सोमवारी अर्जुन खोतकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या दोघांच्या भेटीमुळे राज्यात विविध राजकीय चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांना मागील वाद-विवाद सोडून द्या आणि नव्याने एकत्र काम करा, असं सांगितलं. यावर दोघेही तयार असल्याची कबुली देखील रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याचपार्श्वभूमीवर माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्जुन खोतकर ईडीच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. त्यांनी मला याबाबत कल्पना दिली होती. अर्जुन खोतकर हे कडवे शिवसैनिक ते शिंदे गटात जाणार नाही, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांचं नाव अर्जुन आहे, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खोतकरांसाठी श्रीकृष्णासारखे आहेत आणि श्रीकृष्ण अर्जुनाला कधीही मार्गदर्शन करतो, असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं.
चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, रावसाहेब दानवे हा विचित्र माणूस आहे. रावसाहेब दानवे हे धोका देणारं व्यक्तिमत्व आहे. या माणसावर जालन्यातील लोकांचा देखील विश्वास नाहीय. भाजपाकडून शिवसेनेच्या आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी यांच्या ईडीचा दबाव टाकण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना देखील ईडीच्या खूप नोटीस आल्या. मात्र ते दबावाने कधीही विचलित झाले नाही. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी देखील ईडीला घाबरु नये, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो असेही अर्जुन खोतकर यांनी सांगितले. संकट असेल तर कोणाही व्यक्ती सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच असेही अर्जुन खोतकर म्हणाले. मी माझ्या निर्णयावर सविस्तर बोलणार असल्याचं देखील अर्जुन खोतकरांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर काही बोलत असतील तर त्यांचा तो अधिकार असल्याचे देखील खोतकर यावेळी म्हणाले. मी जालन्याला गेल्या माझी सविस्तरपणे भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितले. माझ्या चेहऱ्यावर तणाव का आहे याची कारणं सर्वांनी माहित असल्याचे देखील अर्जुन खोतकर म्हणालेत.
'दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही'; खोतकरांनी संजय राऊतांना सांगितलेली 'मन की बात' https://t.co/FTu0Q4Jgpz
— Lokmat (@lokmat) July 26, 2022