शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:34 PM2019-10-26T13:34:03+5:302019-10-26T13:36:51+5:30

आता जिल्ह्याच्या विकासाचे मोठे आव्हान

Shiv Sena made history; For the first time in Aurangabad district, there were six seats win | शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

शिवसेनेने इतिहास घडवला; औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच ६ जागा पटकावल्या

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ३० वर्षांचा इतिहासात जनतेने भरभरून दिले

- विकास राऊत 

औरंगाबाद : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जिल्ह्याच्या ३० वर्षांतील कारकीर्दीत पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पक्षाला नऊपैकी  सहा जागा पटकावता आल्या आहेत. पक्षाच्या दृष्टीने हा इतिहास घडला आहे.  

शिवसेनेची औरंगाबाद जिल्ह्यामधील विधिमंडळातील कारकीर्द सुमारे ३० वर्षांची आहे. १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून बबनराव वाघचौरे हे शिवसेनेकडून विजयी झाले,  तर गंगापूरमधून कैलास पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा फडकाविला. ग्रामीण भागात पहिल्यांदाच शिवसेनेला दोन जागा त्यावेळी मिळाल्या. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे पहिले आमदार ठरले. जिल्ह्यात त्यावेळी शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले आणि तो त्यावेळचा पक्षाचा इतिहास ठरला. औरंगाबाद पूर्वमधून हरिभाऊ बागडे विजयी झाल्याने युतीच्या ४ जागा झाल्या होत्या. 

१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून चंद्रकांत खैरे या दोनच जागा शिवसेनेला जिंकता आल्या. त्या निवडणुकीत राज्यात युतीचे सरकार आले मात्र गंगापूरची जागा  शिवसेनेला गमवावी लागली. 

१९९९ साली लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या. यात गंगापूर येथून शिवसेनेचे अण्णासाहेब माने, वैजापुरातून आर. एम. वाणी आणि पैठणमधून संदीपान भुमरे हे विजयी झाले. कन्नड आणि औरंगाबाद पश्चिमची जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. यावेळीही शिवसेनेचे तीनच आमदार होते. 

२००४ सालच्या विधानसभा कुरुक्षेत्रात पैठणमधून भुमरे, गंगापूरमधून माने, वैजापूरमधून वाणी, कन्नडमधून नामदेव पवार विजयी झाले. औरंगाबाद पश्चिम शिवसेनेला जिंकता आले नाही. २००४ ची जिल्ह्यातील शिवसेना आमदारांची संख्या चार होती. 

२००९ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली.  या निवडणुकीत वैजापूरमधून वाणी आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट हे दोनच शिवसेनेचे शिलेदार विधानसभेत गेले. पैठण, गंगापूर, औरंगाबाद मध्य, पूर्व, फुलंब्री, सिल्लोड या जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. पैठणमधून संदीपान भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट, कन्नडमधून हर्षवर्धन जाधव हे विजयी झाले. या वेळची शिवसेना आमदारांची संख्या तीन इतकी होती. 

२०१९ च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या दृष्टीने इतिहास घडला. जिल्ह्यात नऊपैकी सहा जागी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपचेही तीन आमदार निवडून आल्याने युतीची निर्विवाद सत्ता जिल्ह्यावर निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात शिवसेना ठरला मोठा भाऊ 
२०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत लढले. पहिल्यांदाच शिवसेनेला सिल्लोडमध्ये यश मिळाले. तेथे भाजपची दावेदारी असताना सेनेने मुसंडी मारून जागा पदरात पाडली. आ.अब्दुल सत्तार विजयी झाले. भाजपच्या  वाट्याला फुलंब्री, औरंगाबाद पूर्व, गंगापूर मतदारसंघ आले. त्या जागा भाजपने जिंकल्या, तर शिवसेनेला कन्नड, वैजापूर, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, पैठण, सिल्लोड या जागांवर शंभर टक्के यश मिळाले. जिल्ह्यात पहिल्यादांच शिवसेना राजकीयदृष्ट्या मोठा भाऊ ठरला आहे. ९ पैकी ९ जागा महायुतीच्या ताब्यात गेल्या आहेत. 

Web Title: Shiv Sena made history; For the first time in Aurangabad district, there were six seats win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.