शिवसेना आमदार संजय सिरसाट आणि पोलीस उपायुक्तांमध्ये 'तू तू,मैं मैं'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:57 PM2021-09-18T16:57:13+5:302021-09-18T17:01:40+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळे पोलीस सतर्क झाले होते.

Shiv Sena MLA Sanjay Sirsat and Deputy Commissioner of Police 'Tu Tu, Main Main' | शिवसेना आमदार संजय सिरसाट आणि पोलीस उपायुक्तांमध्ये 'तू तू,मैं मैं'

शिवसेना आमदार संजय सिरसाट आणि पोलीस उपायुक्तांमध्ये 'तू तू,मैं मैं'

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरक्षेशी तडजोड नाकारली

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत करून शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापूर्वी किंवा ताफ्यासोबत जाण्याची परवानगी पोलिसांना मागितली. मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आ. शिरसाट यांची पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्याशी 'तू तू, मैं ंमैं' झाली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी विमानतळावर घडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड स्वीकारण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचा ताफा सुसज्ज ठेवण्यात आला होता. सर्व गाड्या तयार होत्या. एका बाजूला असलेल्या ताफ्यात कोणाची गाडी घुसू नये, यासाठी दुसऱ्या बाजूने दोरी बांधण्यात आली होती. शिवसेना आ. शिरसाट हे विमानतळाच्या आतमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून गडबडीने कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांची गाडी दोरी बांधण्यात आलेल्या बाजूला होती. त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दोरी काढण्यास सांगितली. मात्र, दोरी काढण्यास नकार मिळाला. तेव्हा आ. शिरसाट यांचा पारा चढला. त्याच वेळी उपायुक्त गिऱ्हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आ. शिरसाट यांना समजावून सांगत मुख्यमंत्र्यांच्या ताफा गेल्यानंतरच या बाजूची वाहने सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तरीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले आ. शिरसाट यांनी जाण्याचा आग्रह धरला. त्यावर उपायुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे उपस्थितांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. हा प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षेच्या सूचनांचे पालन केले
दरम्यान, यासंदर्भात आ. शिरसाट यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. उपायुक्त गिऱ्हे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा असल्यामुळे सर्वजण अलर्ट होते. सुरक्षेविषयी वरिष्ठांच्या सूचना होत्या. त्याचे पालन पोलिसांनी केले.

Web Title: Shiv Sena MLA Sanjay Sirsat and Deputy Commissioner of Police 'Tu Tu, Main Main'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.