'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 05:45 PM2022-06-22T17:45:09+5:302022-06-22T17:46:14+5:30
''हिदुत्वावर नुसत्या गप्पा मारल्या जातात. जिकडे पैसे तिकडे हे आमदार जातात''
औरंगाबाद: शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत आले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नेते तथा नागरिकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बंडाला जिल्ह्यातील पाच आमदारांचे बळ मिळाले आहे. या सर्व प्रकारावर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी धारदार टीका केली आहे. जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांना सर्व मिळाले तरी त्यांनी बंड केले. येथे कोणाला हिंदुत्व, राजकीय नितीमत्तेशी काही देणघेण नाही जे पैसे देतील तिकडे हे आमदार जातात, अशी टीका एका वृत वाहिनीशी बोलताना खा. जलील यांनी केली.
राज्यसभा निवडणुकी पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपाने जोरदार टक्कर देत धूळ चारली आहे. या दोन धक्क्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे काही आमदार सोबत घेत बंड केल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे यांच्या बंडात मराठवाड्यातील तब्बल ८ आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे यांच्या गोटात गेले आहेत. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांसह प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाट, रमेश बोरणारे या आमदारांनी बंडखोरी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कट्टर शिवसैनिकांनी पक्षात बंडखोरी केल्याने या मागचे राजकारण काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी निशाना साधला आहे. आमदारकी, मंत्रीपद दिले तरी हे बंडखोरी करतात. हिंदुत्व, नितीमत्ता याच्याशी त्यांना काही देणेघेण नाही. हिदुत्वावर नुसत्या गप्पा मारल्या जातात. जिकडे पैसे तिकडे हे आमदार जातात अशी, जहरी टीका खा. जलील यांनी केली आहे. तसेच हा पैशांचा खेळ कसा होतो, हे मी आकडेवारीनुसार दाखवून देईल असा दावाही खा. जलील यांनी यावेळी केला.
सेना आमदार राज्याबाहेर गेले कसे
बळजबरीनं आमदारांना घेऊन गेले असं होऊ शकत नाही. इतके सगळे आमदार महाराष्ट्र सोडून गुजरातला गेले कसे? सरकारला काहीही भनक नाही. सर्व आमदारांना पोलीस संरक्षण आहे. नियमाप्रमाणे जिल्हा सोडताना पोलिसांना कार्यालयात कळवावं लागतं. ४० आमदार गुजरात गेले थैलीत घेऊन गेले का? असा टोला खा. जलील यांनी लगावला.