शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याबाबत सकारात्मक अहवालासाठी मारहाणीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:17 PM2021-08-04T17:17:46+5:302021-08-04T17:56:46+5:30
Shiv Sena MP Bhavana Gawli : खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.
औरंगाबाद : वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावरील कोट्यवधीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत सकारात्मक अहवाल देण्यास नकार दिल्यामुळे औरंगाबादचे सनदी लेखापाल उपेंद्र गुणवंतराव मुळे यांना गुंडामार्फत मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने शासनास उत्तर दाखल करण्यासाठी २ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी ४ आठवड्यांचा वेळ दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाशी संबंधित सकारात्मक अहवाल तयार करुन देण्यासाठी गुंड सईद खानमार्फत दबाव टाकून मारहाण केल्याबाबत सनदी लेखापाल उपेंद्र मुळे (रा. दौलत बंगला, प्लॉट क्र. ६९, मुकुंद हाऊसिंग सोसायटी, महाजन कॉलनी, एन-२, सिडको, औरंगाबाद ) यांनी पोलीस ठाण्यात आणि औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर मुळे यांनी खंडपीठात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी शपथपत्राव्दारे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला.
नागपूर खंडपीठात याचिका
सनदी लेखापाल मुळे यांचे खासदार गवळी यांच्याशी २००८ पासून व्यावसायिक संबंध होते. दरम्यान, श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख हरीश सारडा यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात खासदार गवळी यांनी बेकायदेशीर आणि अवैध कागदपत्रे तयार करण्यासाठी मुळे यांना सप्टेंबर २०१९ मध्ये सांगितले होते. मात्र, मुळे यांनी बेकायदेशीर लेखा परीक्षण अहवाल तयार करण्यास नकार दिला होता. तरीही खासदार गवळी यांनी मुळे यांच्यावर दबाव टाकून अहवाल बनविण्यासाठी गुंडांमार्फत धमक्या आणि मारहाण केल्याचाही प्रकार घडला होता. त्याविरोधात मुळे यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडे खासदार गवळी यांच्यासह सईद खान व अन्य ५ ते ६ जणांविरुध्द तक्रार दिली होती. त्यानंतर खासदार गवळी यांनी हस्तकामार्फत मुळे यांच्याविरुध्द अपहाराचे ५ खोटे गुन्हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दाखल केले. याशिवाय मुळे यांच्या घरी गुंड येऊन धमक्या देऊ लागल्यामुळे ते घर सोडून हॉटेलात राहू लागले होते. पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे १२ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. मुळे यांच्या बाजूने अॅड. अमोल गांधी बाजू मांडत आहेत.