इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना आंदोलकांनी पेटवल्या चुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 PM2021-02-05T18:48:37+5:302021-02-05T18:49:58+5:30
क्रांती चौकात जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत व काही पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीद्वारे येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
औरंगाबाद : इंधन दरवाढीच्या विरोधात शुक्रवारी शिवसेनेने राज्यभर आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून क्रांती चौकात दुपारनंतर शिवसेनेच्या आंदोलक महिलांनी दोन चुली पेटवून त्यावर भाकरी भाजल्या व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर इकडे क्रांती चौकात जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, कन्नडचे आ. उदयसिंग राजपूत व काही पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीद्वारे येऊन जोरदार घोषणाबाजी केली. माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा या आंदोलनात प्रमुख सहभाग होता.
दुपारी साडेतीननंतर शिवसैनिक जमत गेले. महिलांनी आधीच दोन गट करून दोन चुली पेटवल्या होत्या. गॅस सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे आता स्वयंपाक चुलीवर करण्याची वेळ आली आहे, असा संदेश त्यांना द्यायचा होता. पुरुष कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी सुरू केली. अनेकांच्या हातात भगवे झेंडे होते व गळ्यात भगवे गमचे होते.
गॅस दरवाढ करून महिलांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी -शहा यांचा निषेध असो, इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला होता.