बंडखोर अब्दुल सत्तार उद्या सिल्लोडला येणार? रॅलीसाठी पोलिसांकडे मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 07:47 PM2022-06-25T19:47:33+5:302022-06-25T19:48:50+5:30
सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद, रॅली काढत करणार शक्तीप्रदर्शन
सिल्लोड (औरंगाबाद) : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार उद्या सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी १० वाजता सिल्लोड शहरात विशेष हेलिकॉप्टरने ते येणार असल्याची माहिती हाती आली आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे रविवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख देविदास पा. लोखंडे यांनी विविध सर्कल मधील कार्यकर्त्यांना केले आहे.
असा असेल उद्याचा कार्यक्रम
रविवार ( दि.26 ) रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहे. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी रॅली मार्गस्थ होणार असून प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभे नंतर रॅलीचा समारोप होईल.
समर्थनासाठी होणार शक्ती प्रदर्शन....
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर बंडखोर आमदारांना समर्थन देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीसाठी परवानगी मिळावी यासाठी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आल्याची माहिती आहे.