शिवसेना म्हणाली रोड, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची कामे करा; महापालिका प्रशासक म्हणाले...
By मुजीब देवणीकर | Published: August 19, 2022 06:55 PM2022-08-19T18:55:10+5:302022-08-19T18:55:40+5:30
कामे सुरू करा या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले.
औरंगाबाद : निधी अभावी स्मार्ट सिटीचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ३१७ कोटीतील ८७ रस्त्यांची कामे थांबविली. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने ३३ कोटींच्या चार मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलची कामे थांबविली. ही कामे सुरू करा या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले. प्रशासकांनी थेट शब्दात सांगितले की, तूम्ही सर्वांनी महापालिका चालविलेली आहे. तूम्हाला अनुभव आहे. निधी नसेल तर कामे कशी करणार? या सेनेचे शिष्टमंडळ निरूत्तर झाले.
स्मार्ट सिटीत अगोदरच कर्ज काढून मनपाने २५० कोटींचा वाटा टाकला. ३१७ कोटींच्या रस्त्यांसाठी पुन्हा दिडशे ते दोनशे कोटी रुपये कोठून द्यायचे. स्मार्ट सिटीला अतिरिक्त निधी द्यायचा असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागेल. शहराच्या गरजा कोणत्या हे लक्षात घेवूनच काम करण्यात येईल. जसा जसा निधी भविष्यात उपलब्ध होईल, त्या पद्धतीने कामे होतील. मनपा अर्थसंकल्पात रस्त्यांची कामनिहाय तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे रुग्णालये चालविण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री नसेल तर त्या इमारतींचे करायचे काय? शासनाने काहीही देण्यास नकार दिलाय. याचाही आढावा घेवून टप्प्याटप्याने कामे करण्याचा विचार होईल.
रस्ते, रुग्णालये हे दोन मुख्य प्रश्न संपताच सेनेच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी छोट्या-छोट्या विषयांना हात घालायला सुरूवात केली. गुंठेवारीत मंजूर न झालेल्या फाईलींचे पैसे परत द्यावेत, गणेश विसर्जन मिरवणूकीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, औरंगपुरा येथील विसर्जन विहीरीच्या आसपासचा कचरा उचलण्यात यावा, डार्क स्पॉटच्या ठिकाणी वीजेचे फोकस लावावेत. ही सर्व कामे होतील असे आश्वासन डॉ. चौधरी यांनी दिले. दोन कोटी रुपयांपर्यंतचे अंदाजपत्रक तयार करून करण्यात येणारी कामे थांबविण्यात आली. ही कामे पुन्हा सुरू करावीत अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आ. तथा महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी केले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रमुख मागण्यांवर प्रास्ताविक केले. यावेळी त्र्यंबक तूपे, राजु वैद्य, विजय वाघचौरे, गजानन बारवाल, संतोष जेजुरकर, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, किशोर नागरे आदी उपस्थित होते.