जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूकीत सेनेची सरसी; भाजपला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 04:41 PM2020-01-01T16:41:53+5:302020-01-01T16:45:22+5:30
शिवसेनेने पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव या पाच पंचायत समित्यांवर भगवा फडकावण्याची यशस्वी कामगिरी केली.
औरंगाबाद : जिल्ह्यातील भाजपला घरघर लागल्याचा प्रत्यय आज मंगळवारी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत आला. भाजपच्या ताब्यात ९ पंचायत समित्यांपैकी ६ पंचायत समित्या होत्या. यापैकी आज झालेल्या निवडणुकीत अवघ्या दोनच पंचायत समित्या ताब्यात ठेवण्यात भाजप नेतृत्वाला यश आले.
दुसरीकडे, आजच्या निवडणुकीत शिवसेनेने पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव या पाच पंचायत समित्यांवर भगवा फडकावण्याची यशस्वी कामगिरी केली. जिल्ह्यात राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीने वैजापूर आणि औरंगाबाद या दोन पंचायत समित्यांची सत्ता काबीज केली, तर कन्नडमध्ये भाजपच्या मदतीने रायभान जाधव विकास आघाडीने पंचायत समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. असे असले तरी, कन्नडमध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून जाधव कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला. हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर कठोर शब्दांत प्रहार केला. दानवे यांनी संजना जाधव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पंचायत समिती निवडणुकीत भाजपसोबत आघाडीतील चार सदस्यांशी हातमिळवणी केली. या माध्यमातून ‘जालन्याचा चकवा आता कन्नडमध्ये आला’, अशा स्पष्ट शब्दांत हर्षवर्धन जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
सिल्लोड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या कल्पना जामकर, तर उपसभापतीपदी काकासाहेब राकडे विजयी झाले. या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे सदस्य फोडून त्यांना सेनेच्या गोटात आणले. त्या दोन्ही सदस्यांना सभापती- उपसभापती करण्यात आले. यामुळे भाजप येथे ‘बॅकफूट’वर गेली आहे. याशिवाय सोयगाव पंचायत समितीही भाजपच्या ताब्यातून सेनेने खेचली आहे. येथे सभापतीपदी रस्तुलबी पठाण, तर उपसभापतीपदी साहेबराव जंगलू गायकवाड यांची हात उंचावून मतदानाने निवड करण्यात आली. हे दोन्ही सदस्य सेनेचेच आहेत.
गंगापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सविता केरे, उपसभापतीपदी संपत छाजेड यांचा प्रत्येकी एका मताने विजय झाला. भाजपचे वर्चस्व असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचा एक सदस्य सेनेच्या गळाला लागला व सेनेने येथे आपला भगवा फडकावला.
कन्नड पं.स. निवडणुकीत शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने रायभान जाधव विकास आघाडीसोबत हातमिळवणी करीत उपसभापतीवर समाधान मानले. आजच्या या निवडणुकीत विकास आघाडीचे अप्पाराव घुगे, तर उपसभापतीपदावर भाजपच्या नयना तायडे विजयी झाल्या.फुलंब्री पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे दिसून आले. आजच्या निवडणुकीकडे भाजपच्या ७ पैकी नाराज ३ सदस्यांनी गैरहजर राहणे पसंत केले. तरीही या निवडणुकीत भाजपच्या पंचायत समिती सभापतीपदी सविता फुके, तर उपसभापतीपदी संजय त्रिभुवन यांची निवड झाली.
खुलताबाद पंचायत समितीच्या सभापतीपदी गणेश आधाने, तर उपसभापती रेखा चव्हाण बिनविरोध निवडून आल्या.सभापती- उपसभापतीपदासाठी इच्छुक अनुक्रमे युवराज ठेंगडे व प्रभाकर शिंदे यांनी स्थानिक पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. युवराज ठेंगडे यांनी सभापतीपदासाठी अर्ज केला होता. मात्र, स्थानिक पुढाºयांनी समजूत काढून त्यांना अर्ज माग घेण्यास भाग पाडले. तथापि, त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनाम दिल्याचे वृत्त आहे.
औरंगाबाद पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्वीचाच प्रयोग अंमलात आला. याहीवेळी काँग्रेसच्या छाया घागरे या सभापतीपदी बिनविरोध, तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या मालती पडूळ ११ विरुद्ध ९ मतांनी निवडून आल्या. प्रतीस्पर्धी भाजप उमेदवाराला ९ मते पडली.
वैजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सीना मनाजी मिसाळ, तर उपसभापतीपदी वाकला गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र धोंडीराम मगर यांची बिनविरोध निवड झाली. याही पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात आला.
पैठणमध्ये सेनेचीच सरशी
पैठण पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे तेथे सभापती व उपसभापती सेनेचेच झाले. याठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन-दोन सदस्यांना या निवडणुकीत किमान उपसभापतीपदाचे ‘गिफ्ट’ मिळेल, अशी अपेक्षा होती; पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. दुसरीकडे, शिवसेनेचे सभापतीपदाचे प्रबळ दावेदार गणेश पिवळ यांची नाराजी उघडपणे दिसून आली. ते आजच्या या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत.