शिवसेना महिला आघाडीत फ्री स्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:08 AM2017-09-07T01:08:15+5:302017-09-07T01:08:15+5:30

मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर शिवसेना महिला आघाडीतील खदखद समोर आली.

Shiv Sena Women's Frontier Free Style | शिवसेना महिला आघाडीत फ्री स्टाईल

शिवसेना महिला आघाडीत फ्री स्टाईल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर शिवसेना महिला आघाडीतील खदखद समोर आली. महिला आघाडीच्या उपशहर संघटकांच्या नियुक्त्यांपासून सुरू झालेला वाद बुधवारी हातघाईवर आला.
गुलमंडीवरील कार्यक्रम संपल्यानंतर नियुक्त्यांच्या वेळेच्या वादातून उपशहर संघटक राखी सुरडकर आणि मंजूषा नागरे यांच्यात फ्री स्टाईल मारामारी झाली. जिल्हा संघटकपदी रंजना कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्यापासून महिला आघाडीत गटबाजीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप राखी सुरडकर यांनी केला. यातूनच मंजूषा नागरे यांनी जुना वाद उकरून काढत कार्यक्रम संपल्यानंतर एकटीला पाहून वाद घालत हात उचलला असल्याचेही त्यांनी सांगितले. याविषयी मंजूषा नागरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. रंजना कुलकर्णी यांना याविषयी विचारले असता, त्यांनी दवाखान्यात आहे, नंतर बोलते म्हणून भ्रमणध्वनी कट केला.
शिवसेना औरंगाबाद शाखेतर्फे मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुलमंडी येथे बुधवारी सकाळी ९ वाजता अभिवादन आणि सरला शिंदे व सहकाºयांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम थेट ‘मातोश्री’ घराण्याचा असल्यामुळे प्रतिवर्षी मोठ्या संख्येने पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांची गर्दी होत असे. मात्र यावर्षी व्यासपीठासमोरील पूर्ण खुर्च्या रिकाम्या होत्या. यातच उन्हाचा चटका पडताच सर्व खुर्च्या जमा कराव्या लागल्या. प्रारंभी पहिल्या रांगेत काही जण बसले होते. ११.३० वाजेदरम्यान खासदार चंद्रकांत खैरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू झाला. उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे खा. खैरे यांनीही शेजारील दुकानांसमोर खुर्ची टाकली. ही संधी साधत इतर कार्यकर्त्यांनी दुकानांच्या सावलीत खुर्च्या मांडल्या. दुपारी साडेबारा वाजेदरम्यान जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख प्रदीप जैस्वाल कार्यक्रमस्थळी आले. तर आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे, संतोष माने यांच्यासह इतर पदाधिकारीही अनुपस्थित होते. सुहास दाशरथे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपमहापौर स्मिता घोगरे, गटनेते मकरंद कुलकर्णी, महिला आघाडीच्या कला ओझा, सुनीता आऊलवार, रंजना कुलकर्णी, नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena Women's Frontier Free Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.