महागाई विरोधात शिवसेनेचा 'आक्रोश'; संजय राऊत यांच्या नेतृवात औरंगाबादेत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 12:35 PM2021-11-13T12:35:36+5:302021-11-13T12:45:23+5:30
Shiv Sena Akrosh Morcha :संपूर्ण क्रांती चौक परिसरात भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
औरंगाबाद : खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी १२ वाजता शिवसेनेचा महागाईविरोधात आक्रोश मोर्चा क्रांती चौक येथून निघाला. मोर्चात मराठवाड्यातील शिवसेना नेते आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा समावेश आहे. संपूर्ण क्रांती चौक परिसरात भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.
क्रांती चौकातून विविध फोटो आणि, फलक घेऊन शिवसैनिक खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चात सहभागी झाले आहेत. महागाई विरोधातील विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मोर्चा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ. मनीषा कायंदे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, मंदार चव्हाण यांच्यासहा मराठवाड्यातील शिवसेनेचे अन्य नेते सहभागी आहेत. मोर्चाची सांगता गुलमंडी येथे होईल, अशी माहिती आयोजक जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी दिली.
मोर्चा आधी मनसे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्ते ताब्यात
दरम्यान, मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे आणि कार्यकर्ते गुलमंडी येथे शिवसेनेचा आक्रोश मोर्चा विरोधात आंदोलन करण्यासाठी सकाळी ११ वाजेदरम्यान जमा झाली. मात्र, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी, महागाई विराेधातील आक्रोश मोर्चा हे केवळ ढोंग आहे. त्या मोर्चाच्या निषेधार्थ मनसे आंदोलन आहे. शहरातील पाणीपट्टी कमी करून दाखवा, नंतर इतर महागाईवर बोलावे, असे आव्हान दिले. इंधनावरील कर कमी करून पेट्रोल, डिझेल स्वस्त करून महागाई कमी करता येणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.