शिवसेनेचे ‘एक घर, एक उमेदवार’ धोरण; प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:50 PM2020-02-28T14:50:02+5:302020-02-28T14:50:02+5:30

सामान्य कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा भाग 

Shiv Sena's 'one house, one candidate' policy for Aurangaabd Municipality Election | शिवसेनेचे ‘एक घर, एक उमेदवार’ धोरण; प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता

शिवसेनेचे ‘एक घर, एक उमेदवार’ धोरण; प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देवरिष्ठ नेतेच सर्व निर्णय घेणार

- नजीर शेख 

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकाच घरात दोन ते तीन उमेदवारांना तिकीट देण्याची मागणी काही नेत्यांनी केली असली तरी शिवसेनेचे ‘एक घर, एक उमेदवार’ असे धोरण राबविले जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

महापालिका निवडणुकीसाठी सध्या शिवसेनेत विविध वॉर्डांमध्ये तिकीट वाटपासंबंधी चर्चा सुरू आहे. यंदा भाजपसोबत शिवसेनेची युती नसल्याने, तसेच भाजपबरोबर लढा द्यावा लागणार असल्याने शिवसेनेने वेगळी रणनीती अवलंबली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या रणनीतीचा भाग म्हणून शिवसेना एकाच घरात अनेक तिकिटे वाटप करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नाराज करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी तिकीट वाटपात पक्षातील स्थानिक नेत्यांची लुडबूड चालणार नाही, असे चित्र आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेच तिकीट वाटपाचा निर्णय घेणार आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट आणि महानगरप्रमुख आ. प्रदीप जैस्वाल यांच्याशी याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.स्वगृही परतलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्याशीही याबाबत चर्चा होईल. मात्र, अंतिम निर्णय हा मुंबईतूनच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शिवसेनेचे दिवाकर रावते वगळता मुंबईचे नेतृत्व हे सातत्याने स्थानिक नेतृत्वावर विसंबून राहिले आहे. मात्र, सुभाष देसाई यांच्याकडे पालकमंत्रीपद गेल्यानंतर स्थानिक ते स्थानिक नेतृत्वावर फारसे विसंबून नसल्याचे समोर येत आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे त्यांच्याच हाती असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेमध्ये एकाच घरातील व्यक्ती आलटून-पालटून महापालिकेत नगरसेवक म्हणून जात आहेत. त्यामुळे  शिवसैनिकांत सातत्याने नाराजीचा सूर आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या घरातून तर मुलगा आणि पुतण्या, असे दोन जण नगरसेवक होते. आगामी निवडणुकीसाठीही काही नेतेमंडळी आपल्याच घरात एकापेक्षा अधिक तिकिटे मिळावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, पक्षाकडून ‘एक घर, एक उमेदवार’ हे धोरण ठरत आहे. याचा फटका काही नेते आणि विद्यमान नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे. 

कार्यकर्त्यांना सांभाळणार
महापालिकेत शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून तेच तेच चेहरे महापालिकेत दिसत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. सामान्य कार्यकर्त्यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट मिळेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत असतानाच शिवसेनेमध्ये नवे धोरण राबविले जाणार असल्याचे समोर येत आहे. 

कोणाला बसणार फटका
विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, सभागृहनेता विकास जैन यांच्या कुटुंबात एकापेक्षा अधिक तिकिटांची मागणी होत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने ‘एक घर, एक उमेदवार’ हे धोरण राबविल्यास अनेकांना त्याचा फटका बसणार आहे.

वरिष्ठ निर्णय घेतील
यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा असते. त्यादृष्टीने निवडणुकीच्या वेळी प्रयत्न होत असतात. शिवसेनेने नेहमी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. निवडणुकीत निवडून येण्याचा निकषही पाहिला जातो. यावेळीही तसेच होईल. ‘एक घर, एक उमेदवार’ या धोरणाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते उचित निर्णय घेतील.

Web Title: Shiv Sena's 'one house, one candidate' policy for Aurangaabd Municipality Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.