शिंदे गटाच्या रणनीती पुढे शिवसेनेचे डाव निष्प्रभ; औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 06:42 PM2022-08-05T18:42:02+5:302022-08-05T18:43:39+5:30
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती.
औरंगाबाद: जिल्ह्यात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत शिंदे गटाने वर्चस्व राखले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे डाव शिंदे सेनेतील आ. संजय शिरसाट , संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या रणनीती पुढे निष्प्रभ ठरले. बंडखोरी नंतर झालेल्या पहिल्याच परीक्षेत शिंदे गटाने वर्चस्व मिळवल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अधिक चुरशीच्या होतील असे चित्र आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, सिल्लोड आणि औरंगाबाद पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. या तिन्ही ठिकाणच्या ग्राम पंचायत निकालात शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाल आहे. जिल्ह्यातील सेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना कसे यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. याला तेवढ्यात तोडीची रणनीती आखून प्रत्युत्तर आ. शिरसाट, सत्तार आणि भुमरे यांनी दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आ. संजय शिरसाट यांच्या मतदार संघातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीत १७ जागा होत्या. यातील तब्बल ११ जागा जिंकत शिंदे गटाने शिवसेनेला धक्का दिला आहे. येथे शिवसेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला दोन जागा मिळाल्या.
अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये तीन ग्राम पंचायतीसाठी निवडणूक झाली. नानेगाव, उपळी, जंजाळा तिन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे.
तसेच संदीपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अनरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.