शिवाजी हायस्कूलची शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:55 PM2018-12-04T23:55:55+5:302018-12-04T23:56:23+5:30

खोकडपुरा येथील शिवाजीहायस्कूलमध्ये संचमान्यता मिळविण्यासाठी चक्क बनावट पटसंख्या दाखविण्यात येत होती. तपासणीच्या वेळी संस्थेच्या रांजणगाव येथील शाळेतील विद्यार्थी घेऊन येत. हा सगळा बोगस प्रकार पुन्हा एकदा प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाºयांनी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये समोर आला आहे.

Shivaji High School took education from Jharkhand | शिवाजी हायस्कूलची शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती

शिवाजी हायस्कूलची शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती

googlenewsNext
ठळक मुद्देधक्कादायक बाबी उघड : बोगस पटसंख्येवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब; संचमान्यतेसाठी समांतर शाळा उघडली


औरंगाबाद : खोकडपुरा येथील शिवाजीहायस्कूलमध्ये संचमान्यता मिळविण्यासाठी चक्क बनावट पटसंख्या दाखविण्यात येत होती. तपासणीच्या वेळी संस्थेच्या रांजणगाव येथील शाळेतील विद्यार्थी घेऊन येत. हा सगळा बोगस प्रकार पुन्हा एकदा प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाºयांनी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये समोर आला आहे. प्राथमिकच्या पहिली ते पाचवीच्या १२ तुकड्यांमध्ये १९ विद्यार्थी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ४७४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ११० विद्यार्थी उपस्थित असल्याचे दिसून आले.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधार संचालित खोकडपुरा येथील शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.३) गोवर-रुबेला लस देण्यात येणार होती. या प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीपर्यंत एकूण १२ तुकड्या आहेत. यात १४ शिक्षक कार्यरत आहेत. प्रतितुकडी ३० याप्रमाणे ३६० विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळेत असणे आवश्यक आहे. मात्र, शाळेत विद्यार्थीच नसल्यामुळे रांजणगाव येथे बेकायदा पहिली ते चौथीचे वर्ग भरविण्यात येतात. या विद्यार्थ्यांचे प्रवेश खोकडपुरा येथील शाळेच्या पटावर दाखविण्यात आलेले आहेत. खोकडपुरा येथे कोणताही कार्यक्रम असेल, तर या विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमधून आणण्यात येते. सोमवारीही १२२ विद्यार्थ्यांना आणले. त्यांना गोवर-रुबेलाची लस देऊन परत घेऊन जात असताना बसला अपघात झाला. यामुळे शाळेत चालणाºया या गैरप्रकाराचा भांडाफोड झाला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ३५
अन् विद्यार्थी ११०
जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाºयांनी मंगळवारी सकाळीच शाळा भरल्यानंतर शाळेची तपासणी सुरू केली. विस्तार अधिकारी कापसे यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. तेव्हा वर्गांमध्ये ६, ९, ८ व १०, अशा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. माध्यमिक विभागात एकूण २३ शिक्षक आणि १२ शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ आहेत. त्यापैकी अनेक जण अनुपस्थित होते. २७ आॅक्टोबर रोजी शाळेचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी तपासणी केली असता ६०० पैकी १५० विद्यार्थीच आढळून आले होते. यानंतर डॉ. चव्हाण यांनी बोगस पटसंख्येमुळे मुख्याध्यापकाचा पगार थांबवला होता. तेव्हा मुख्याध्यापकांनी १९५ विद्यार्थी कमी केल्याचे पत्र दिले. मंगळवारी (दि.४) डॉ. चव्हाण यांनी केलेल्या पाहणीनुसार ४७४ पटसंख्येपैकी केवळ ११० विद्यार्थीच आढळून आले. शिक्षकांच्या हजेरीपटावर असलेल्यांपैकी अनेक शिक्षक प्रत्यक्षात शाळेवर हजरच नव्हते. याचा जाब मुख्याध्यापक एस.पी. थोटे यांना विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संतप्त झालेल्या डॉ. चव्हाण, विस्तार अधिकारी कापसे यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचे हजेरीपट जप्त केले आहेत.
तुकड्या १२, शिक्षक १४ अन् विद्यार्थी १९
खोकडपुरा येथीलच शिवाजी हायस्कूलमध्ये प्राथमिक विभाग आहे. याच विभागात गोवर-रुबेला लस देण्यासाठी विद्यार्थ्यांना आणले होते. ही शाळा दुपारी १२ वाजता भरते. मात्र, मंगळवारी शिक्षणाधिकारी येणार असतानाही शाळेतील शिक्षक वेळेवर पोहोचलेच नाहीत. जे पोहोचले त्यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थनाही वेळेवर सुरू केली नाही. शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी तात्काळ प्रार्थना सुरू करण्याचे आदेश दिले. प्रार्थनेसाठी पहिलीच्या वर्गात ३, दुसरीत ५, तिसरीत ३ आणि चौथीला ८ विद्यार्थी असल्याचे दिसून आले. यातील केवळ ३ विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा ड्रेस होता. पटावर मात्र ३६० विद्यार्थी दाखविण्यात आलेले असून, १४ शिक्षक कार्यरत आहेत. प्राथमिकचे मुख्याध्यापक बालू मैंद हे शाळेत आलेले नव्हते. जैस्वाल यांनी सगळ्या गौडबंगालाचा जाब विचारला असता, कोणालाही उत्तर देता आले नाही. यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी संगीता नवले यांच्यासह इतरांनी शाळेच्या दप्तराची तपासणी केली आहे.

रांजणगाव येथील प्राथमिक शाळेला मान्यताच नाही
रांजणगाव शेणपुंजी येथील प्राथमिक शाळेला मान्यताच नाही. खोकडपुरा येथील शिक्षकांनी तेथे काही शिक्षकांची नेमणूक करून अनधिकृतपणे शाळा सुरू केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक शाळेतील पूर्णवेळ शिक्षक त्या बोगस शाळेतील शिक्षकांचा पगार करतात. पगार घेणाºया प्राथमिकच्या शिक्षकांना मात्र काहीच काम नसल्याचेही दिसून आले.
संचमान्यतेसाठी न्यायालयात धाव
या शाळेत बोगस पटसंख्या दाखवून संचमान्यता घेण्यात येते. दोन शिक्षकांची संचमान्यता मंजूर केली नसल्यामुळे शिक्षण विभागाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. शाळेत विद्यार्थी नसले तरी बनावट पटसंख्या दाखवून संचमान्यता कायम ठेवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येत आहे.

कोट,
शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. पटसंख्या बनावट असल्याचे दुसºयांदा उघड झाले आहे. पहिल्यावेळी मुख्याध्यापकाचा पगार बंद केला. आता खरी संख्या दाखविल्याशिवाय इतरांचाही पगार केला जाणार नाही. याचवेळी शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस शासनाकडे केली जाईल.
-डॉ. बी.बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक
...
प्राथमिकची शाळा सुटेपर्यंत शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत होते. तोपर्यंत प्रार्थनेला उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांची भर पडली. रांजणगाव येथील शाळेच्या तपासणीसाठीही पथक पाठविले होते. तेथील अहवाल आल्यानंतर प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षण संचालकांना अहवाल दिला जाईल.
-सूरजप्रसाद जैस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

 

Web Title: Shivaji High School took education from Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.