'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे आदर्श....' वाचा नेमके काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:16 PM2022-11-19T16:16:18+5:302022-11-19T16:21:29+5:30
विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले.
औरंगाबाद: आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शरद पवार यांनी शेती क्षेत्रात अभूतपूर्व काम केले आहे. ते राग आला तरी साखरेपेक्षा गोड असतात. गडकरी यांना तर आता रोडकरी म्हटले जात आहे. विद्यापीठाने देशातील या दोन नक्षत्रांचा प्रस्ताव दिला तेव्हा आनंद झाला. आणखी दोन विद्यापीठाचे देखील प्रस्ताव आहेत. या दोघांबद्दल आता बोलतोय कारण हे आपल्या समोर आहेत. आपल्यासाठी उदाहरण आहेत. यांचे कार्य अनेक पटींनी मोठे आहे. आम्ही शिक्षण घेत असताना. शिक्षक विचारायचे, तुमचा आदर्श कोण आहे. तर सुभाष चंद्र बोस, नेहरू सांगायचो. आता जर विचारले तर मला असे वाटते की बाहेर पाहण्याची गरज नाही. येथेच महाराष्ट्रात आदर्श मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत, असे मत कोश्यारी यांनी मांडले. याचा वक्तव्यावरून आता वादाला तोंड फुटले आहेत.
व्हिजनरी सोबत मिशनरी व्हावे
शरद पवार आणि नितीन गडकरी हे व्हिजनरी आहेत. गडकरी तर व्हिजनरी सोबत मिशनरी आहेत. व्हिजनरी सोबत ते कार्य 'मिशन' पूर्ण करण्यासाठी एक प्रकारचा वेडेपणा हवा. गडकरी आणि पवार यांना कोणतेही काम द्या ते पूर्ण करून दाखवतात. येथून बाहेर पडताना देशाला विश्वगुरु करण्याचा संकल्प घेऊन जा. या ध्येय प्राप्तीसाठी इच्छशक्ती, संकल्पशक्ती प्रबळ पाहीजे. एकेकाळी देशात उपदेश जास्त दिला जात होता. आता देशात केवळ उपदेशापेक्षा हाती घेतलेले काम पूर्ण केले जाते. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक घरात स्वच्छतागृह, प्रत्येकाचे बँक खाते काढून काम पूर्ण करून दाखवले. तुम्हीही संकल्प केला तर काहीही करू शकता मोदींपेक्षा मोठे बनू शकता, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
गुणवत्तावाढीसाठी सदैव सोबत - शरद पवार
मला शैक्षणिक संस्थानची काळजी वाटते. त्यामुळे दर्जा सुधारण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करायचे असेल तर आपल्याला शैक्षणिक दर्जा सुधारावा लागेल. हे सर्व करण्यात सर्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अग्रेसर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्व क्षेत्रात कसे आघाडीवर राहू याची काळजी घेऊ. आपल्यातील, मराठवाड्यासाठी अतीव आस्था असलेल्या सहकारी म्हणून गुणवत्ता वाढीसाठी कशी दोन पाऊले पुढे टाकू आणि यशस्वी होऊ या कार्यात सोबत राहील याचा विश्वास देतो, अशी ग्वाही देतो असेही शरद पवार म्हणाले.