शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वमुखी की उत्तरमुखी, विद्यापीठात आणखी एक वाद
By शांतीलाल गायकवाड | Published: September 19, 2022 02:19 PM2022-09-19T14:19:56+5:302022-09-19T14:19:56+5:30
विद्यापीठातील पुतळा आणखी एका वादात अडकला असून पुतळ्याची दिशा चुकल्याचे आंबेडकराईट मूव्हमेंटने निदर्शनास आणून दिले आहे.
औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता दिशेच्या वादात अडकण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी अनावरण करण्यात आलेला हा पुतळा पूर्वमुखी असून, ही चूक विद्यार्थी संघटनांनी सोमवारी कुलगुरूच्या निदर्शनात आणून देत, पुतळ्याची दिशा बदलण्याची मागणी केली.
या मागणीने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अडचणीत आले असून त्यांनी या चुकीला पुतळा समितीला जबाबदार धरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यात व देशात उभारलेले पुतळे हे उत्तरमुखी आहेत. याचे कारण असे की, शिवरायांना उत्तर अर्थात दिल्लीचे तख्त पादाक्रांत स्वप्न होते. ते दर्शविण्यासाठी शिवाजी महाराजांचे पुतळे देशात कायम उत्तर मुखी असतात. याबाबत आंबेडकराईट मूव्हमेंटचे विजय वाहूळ यांनी कुलगुरुंना निवेदन दिले आहे.
पुतळ्यावरून वाद शमेनात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आला तेव्हापासून वाद सुरु आहेत. पुतळा असावा की नाही यावर पडदा पडून मंजुरी मिळाली. त्यानंतर पुतळा कसा असावा? नियोजित जागा बदलावी लागली. त्यानंतर अनावरण पत्रिका आणि कोनशिलेवर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची नावे वगळण्यात आली. हा वाद थांबत नाही तोच आता पुतळ्याची दिशा चुकली असा वाद उपस्थित करण्यात आला आहे.